तन्वी, आनंदने घातला 51 लाखांचा गंडा
रिकव्हरी एजंट, मॅनेजरचे कारनामे उघड
मडगाव : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या काकोडा शाखेविरुद्ध 51 लाख रुपयांना फसविल्याच्या आणखी 17 तक्रारी आलेल्या असून या तक्रारींची खातरजमा करुन बँक मॅनेजर आनंद गणपत जाधव आणि व्हिजन इंडियाची रिकव्हरी एजन्ट तन्वी वस्त यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांनी बुधवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांच्या सोबत केपे विभागाचे पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्कर, कुडचडेचे निरीक्षक तुकाराम चव्हाण व अन्य उपस्थित होते. ग्राहकांची बँकेतील कामे करण्यासाठी बँक मॅनेजर आनंद गणपत जाधव बँकेच्या नियमित कर्मचाऱ्यांकडे ग्राहकांना न पाठवता व्हिजन इंडियाची रिकव्हरी एजन्ट असलेल्या तन्वी वस्त हिच्याकडे पाठवत होता, असे पोलिस चौकशीत आढळून आले आहे.
तन्वी वस्तने सोने गहाण ठेऊन घेतले कर्ज
संशयित आरोपी तन्वी वस्त हिने एका ज्येष्ठ महिला नागरिकाचे बँकेतील असली सोने काढून त्याजागी बनावट सोन्याचे दागिने ठेवले. संशयित तन्वी हिने असली दागिने कुडचडे येथील धनवर्षा गोल्ड लोन या आस्थापनात गहाण ठेऊन तेथून 25 लाखांचे कर्ज काढले होते असेही पोलिस तपासात आढळून आले आणि पोलिसांनी 18.45 लाख रुपये किंमतीचे सोने धनवर्षा गोल्ड लोनकडून जप्त केले असल्याची माहिती सावंत यांनी दिली. दि. 31 जुलै 2024 ते 21 नोव्हेंबर 2024 या दरम्यान कुडचडे पोलिसस्थानकात अनेक तक्रारी आल्या. मंगळवारी 26 रोजी एकाच दिवशी कुडचडे पोलिसस्थानकात एकूण 17 तक्रारी आलेल्या असून या सर्व तक्रारी नोंद करण्यात येणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली. कुडचडे येथील पास्कोल वाझ (83), स्टीव्हन फर्नाडिस (51) व सुषमा दिनेश (69) यांनाही तन्वी वस्त हिने फसविले. पास्कोल यांना 1.40 लाख, स्टीव्हन यांना 8 लाख रुपयांना फसविल्ल्याचे तक्रारीत म्हटलेले आहे.
ग्राहकांना फसविण्याची पद्धत
अनेक ग्राहकांना फसविण्याच्या या प्रकारात बँक मॅनेजर आनंद गणपत जाधव याची प्रमुख भूमिका आहे, असे तपासात दिसून आले आहे. हा मॅनेजर ग्राहकांना तन्वी वस्त हिच्याकडे पाठवत. संशयित तन्वी वस्त ही ज्येष्ठ नागरिकांना साहाय्य करण्याच्या बहाण्याने ग्राहकांच्या अनेक फॉर्मवर सह्dया घ्यायची. बँक मॅनेजरने तन्वी हिच्याकडे पाठवले असल्यामुळे बँक मॅनेजर योग्य कर्मचाऱ्यांकडेच पाठवणार अशी ग्राहकांची समजूत होत होती आणि त्याच भावनेने ग्राहक तन्वी वस्त सांगत असलेल्या फॉर्मवर सह्या करत होते. त्यानंतर तन्वी वस्त ग्राहकांच्या या सह्या त्यांच्याच खात्यातील रक्कम आपल्या खात्यात वळवण्यासाठी वापरायची. आपली रक्कम कायम ठेवीत (फिक्स्ड डिपोझीट) जमा करण्यात आलेली असून एक दोन दिवसात तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल, असे ती ग्राहकांना सांगत होती. मात्र जमा केलेल्या रकमेची सर्टिफिकेट अनेक दिवस मिळत नसल्याचे पाहून ग्राहक बँक मॅनेजरकडे यायचे आणि बँक मॅनेजर संशयित तन्वी वस्त हिच्याकडे बोट दाखवत. अशा पद्धतीने ही मंडळी ग्राहकांची रक्कम लंपास करायचे, असेही पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.