Tanmor Bird : दुर्मीळ माळढोक प्रजातीतील 'तणमोर' पक्ष्याचे रत्नागिरीच्या सड्यावर दर्शन!
पक्षी अभ्यासक अॅड. प्रसाद गोखलेंनी टिपले सुंदर छायाचित्र
By : राजेंद्र शिंदे
चिपळूण : आययुसीएनतर्फे प्रसिद्ध यादीत संकटग्रस्तमधून अतिसंकटग्रस्त श्रेणीमध्ये हलवलेल्या आणि संपूर्ण जगात अवघ्या शेकड्यांमध्ये शिल्लक असलेल्या दुर्मीळ माळढोक प्रजातीतील लेसर फ्लोरिकन म्हणजेच तणमोर या पक्ष्याचे दर्शन रविवारी रत्नागिरीतील सड्यावर झाले आणि जिल्ह्याच्या रेकॉर्डवर प्रथमच या पक्ष्याची नोंद झाली.
पक्षी अभ्यासक अॅड. प्रसाद गोखले यांनी अन्नग्रहण करताना टिपलेल्या तणमोरच्या छायाचित्राने रत्नागिरीतील जैवविविधता आणि सड्यांच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. लेसर फ्लोरिकन हा पक्षी माळढोक प्रजातीत मोडतो. मराठीमध्ये या पक्ष्याला तणमोर असे म्हणतात. गवताळ प्रदेश हा या पक्ष्याचा मुख्य अधिवास आहे.
गवताळ प्रदेशांचे प्रमाण महाराष्ट्रात कमी झाल्यामुळे तणमोरांच्या महाराष्ट्रातील संख्येवर मोठा परिणाम झाला आहे. बीएनएचएस 2020 च्या अहवालानुसार गुजरात, दक्षिण पूर्व राजस्थान, उत्तर पश्चिम महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेशातील काही भागात तणमोर पक्षी सीमित झाले आहेत. महाराष्ट्रात हे पक्षी हिवाळी स्थलांतर करतात.
काही दिवसांपूर्वी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील एका कॅमेरा ट्रॅपमध्ये मादी तणमोर पक्ष्याचे छायाचित्र मिळाले होते. याआधीच्या नोंदीनुसार नाशिक, अहमदनगर, सोलापूर, अकोला आणि गेल्या वर्षी भिगवण परिसरामध्ये हा पक्षी आढळून आला होता. वीजवाहक तारांचा या पक्ष्यांना सर्वात मोठा धोका समजला जातो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वीजवाहक तारांवर बर्ड डायव्हर्टर बसवणे अत्यंत आवश्यक असते.
यावर कार्यवाही होणे तणमोर संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. एकूणच कमी होणारा अधिवास आणि तणमोरांची एकूण संख्या पाहता जी अद्ययावत लाल यादी आययुसीएनतर्फे प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये या पक्ष्याला संकटग्रस्त श्रेणी मधून अतिसंकटग्रस्त श्रेणीमध्ये हलवण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर रत्नागिरीत दिसलेल्या या पक्षाने जिल्ह्यातील पक्षीवैभवाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
खराब हवामानामुळे आल्याचा अंदाज
शहरातील पक्षी अभ्यासक अॅड. गोखले हे पक्षी निरीक्षणासाठी बाहेर पडले असता त्यांना शहरातील एका ठिकाणी हा मादी पक्षी आढळून आला. खराब हवामानामुळे कदाचित हा पक्षी चुकून येथे आला असावा असे अनेक पक्षीतज्ञांचे मत आहे. हा पक्षी रत्नागिरीत ज्याठिकाणी आढळून आला त्या अधिवासात सुमारे 250 हून अधिक पक्षांच्या प्रजातींची नोंद अॅड. गोखले आणि त्यांच्या सहकारी पक्षी निरीक्षकांकडून करण्यात आली आहे.
रत्नागिरीचा अधिवास पक्ष्यांसाठी समृद्ध
याबाबत चिपळूण येथील वन्यजीव अभ्यासक ओंकार बापट यांनी सांगितले की, हा पक्षी दिसल्याचे कळल्यावर मीही लगेचच अॅड. गोखले यांच्यासोबत त्या ठिकाणी गेलो. तसे पाहिले तर रत्नागिरी जिह्याचा एकूण अधिवास पक्ष्यांसाठी समृद्ध आहे. नुसतेच डोंगराळ प्रदेश एवढाच हा अधिवास मर्यादित नाही. सड्यांसारखे गवताळ प्रदेश, खाड्या, समुद्रकिनारे, नद्या, दलदली प्रदेश, जंगल आणि महत्त्वाचे म्हणजे खाजण ही जिल्ह्यातील विविधता पक्ष्यांच्या अधिवासासाठी महत्त्वाचे ठरते, असे बापट यांनी सांगितले.
तणमोरचे संरक्षण रत्नागिरीकरांचे कर्तव्य
"तणमोर पक्षी हा आपल्या जिह्यात आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे. सध्याच्या खराब हवामानामुळे स्थलांतर करताना हा पक्षी येथे थांबला असावा किंवा भरकटून येथे आला असावा. मात्र तो जितके दिवस येथे आहे तितके दिवस त्याच्यासमोर असणाऱ्या अनेक संकटांपासून त्याचे संरक्षण करणे हे पक्षीप्रेमी म्हणून सर्वच रत्नागिरीकरांचे कर्तव्य आहे. या परिसरात या पक्ष्यासाठी भटक्या कुत्र्यांसारखे काही धोके आहेत. यामुळे या पक्ष्याचे संरक्षण हे आपल्यासमोर असणारे मोठे आव्हान आहे."
- ओंकार बापट, वन्यजीव अभ्यासक, चिपळूण