हिरेबागेवाडी घाटात टँकरला गळती लागल्याने धावपळ
आठ तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात
बेळगाव : ज्वालाग्रही अॅसिडवाहू टँकरला गळती लागल्याने एकच धावपळ उडाली. बुधवारी सकाळी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हिरेबागेवाडी घाटात हा प्रकार घडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल आठ तासांहून अधिकवेळ प्रयत्न करून टँकरला लागलेली गळती रोखली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास टँकरला गळती लागल्याचे दिसून आले. त्वरित हिरेबागेवाडी पोलिसांना यासंबंधीची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवांनानाही पाचारण करण्यात आले. वेळेत गळती रोखली नसती तर अनर्थ घडला असता. जिल्हा अग्निशमन दलाचे अधिकारी शशीधर निलगार, अरुण माळोदे, आय. वाय. माडगेर, सदानंद राचण्णावर, चन्नय्या हिरेमठ, अशोक पाटील आदींनी तब्बल आठ तास प्रयत्न करून टँकरच्या ज्या भागाला गळती लागली होती, तेथे पॅच लावून गळती रोखली. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कार्यवाही पूर्ण झाली. या टँकरमध्ये हायक्लोरिन अॅसिड होते.