तनिषा- कपिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत
सिंधू, राजावत यांचे एकेरीतील आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/निंगबो (चीन)
येथे सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि प्रियांशु राजावत यांचे एकेरीतील आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. मात्र मिश्र दुहेरीत भारताच्या तनिषा क्रेस्टो आणि ध्रुव कपिला यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. गुरुवारी येथे खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या सामन्यात जपानच्या तृतिय मानांकीत अकेनी यामागुचीने भारताच्या 29 वर्षीय पी. व्ही. सिंधूचा 21-12, 16-21, 21-16 अशा गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. हा सामना 70 मिनिटे चालला होता. या सामन्यात यामागुचीने पहिला गेम जिंकून आघाडी मिळविल्यानंतर सिंधूने दुसरा गेम जिंकून बरोबरी साधत रंगत आणली. पण तिसऱ्या आणि शेवटच्या गेम्समध्ये सिंधूची अधिक दमछाक झाल्याचे जाणवले आणि यामागुचीने हा गेम 21-16 अशा फरकाने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
पुरुष एकेरीच्या सामन्यात जपानच्या पाचव्या माकांकीत कोदाई नाराओकाने भारताच्या प्रियांशु राजावतचे आव्हान 21-14, 21-17 अशा गेम्समध्ये संपुष्टात आणले. त्याच प्रमाणे थायलंडच्या व्हिटीडेसमने भारताच्या किरण जॉर्जचा 19-21, 21-13, 21-16 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत पुरुष आणि एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. मिश्र दुहेरीच्या सामन्यात भारताच्या तनिषा क्रेस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीने चीन तैपेईच्या वेई आणि चेन यांचा 12-21, 21-16, 21-18 अशा गेम्समध्ये फडशा पाडत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता कपिला आणि तनिषा या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना हाँगकाँगच्या तेंग आणि टेसी यांच्याबरोबर होणार आहे. मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या ए. सुर्या आणि अमृता पी. यांचे आव्हान चीनच्या बेंग आणि झीन यांनी 21-11, 21-14 असे संपुष्टात आणले.