तानाजी गल्ली रेल्वेगेट अखेर कायमस्वरुपी बंद
बेळगाव : अखेर तानाजी गल्ली रेल्वेगेट कायमस्वरुपी बंद झाला असून, सदर गेट बंद करण्यासाठी जेसीबी आणून तेथे मोठी चर खोदण्यात आली आहे. त्यामुळे आता या गेटवरील वर्दळ कायमची थांबली आहे. रेल्वेगेट बंद झाल्यास कपिलेश्वर आणि जुना धारवाड रोड येथील उड्डाण पुलावर वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची नेहमीच गैरसोय होणार आहे. त्यामुळे हे गेट बंद करू नये, अशी मागणी होती. यापूर्वीही हे रेल्वेगेट बंद होण्याची चर्चा सुरू झाली. त्यावेळी नागरिकांनी त्याला प्रचंड विरोध केला आणि हे गेट बंद करू नये, अशी मागणी केली. त्यावेळी हे काम सुरू झाले नव्हते. मात्र 10 मार्चपासून हे रेल्वेगेट कायमस्वरुपी बंद होईल, असा सूचना फलक नैर्त्रुत्य रेल्वेने लावला आणि पुन्हा एकदा हा प्रश्न चर्चेत आला.
रेल्वे प्रशासनाने गेट बंद करण्याबाबत वेगवेगळी कारणे दिली. खासदार जगदीश शेट्टर यांनी जेव्हा याठिकाणी होणाऱ्या उड्डाण पुलासंदर्भात व्यापारी, नागरिक व रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेतली तेव्हाही याला विरोधच झाला होता. तेव्हा नैर्त्रुत्य रेल्वेने येथे होणारा उड्डाणपूल रद्द केला. मात्र रेल्वेगेट बंद राहील, असे स्पष्ट केले होते. पूलच होणार नाही यातच नागरिकांनी समाधान मानले. त्यामुळे कायमस्वरुपी रेल्वेगेट बंद होण्याबाबतचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले नाही. मात्र रेल्वेगेट बंद राहील हा नैर्त्रुत्य रेल्वेचा सूचना फलक पाहून नागरिक खाडकन जागे झाले आणि गेट बंद करू नये, अशी भूमिका त्यांनी घेतली. तथापि रेल्वे विभागाने हे गेट कायमस्वरुपी बंद केले व सोमवारपासून जेसीबी आणून कामाला सुरुवातही केली.