तामिळनाडूच्या मंत्र्याने गुजरातला संबोधिले ड्रग कॅपिटल
राज्यपालांच्या आरोपांवर दिले प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूचे मंत्री एस. रेगुपथी यांनी राज्यपाल आर.एन. रवि यांच्या आरोपांनंतर गुजरातला ड्रग कॅपिटल संबोधिले आहे. तामिळनाडूतील अधिकारी एक ग्रॅम देखील सिंथेटिक ड्रग्स जप्त करू शकत नाहीत. दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात शेकडो किलोग्रॅम अमली पदार्थ जप्त करत आहेत असे म्हणत राज्यपाल रवि यांनी तामिळनाडू पोलिसांवर टीका केली होती.
केंद्रीय यंत्रणा शेकडो किलो सिंथेटिक आणि रासायनिक ड्रग्स जप्त करण्यास सक्षम आहेत, तर आमच्या राज्याच्या यंत्रणा एक ग्रॅम देखील ड्रग्स जप्त करू शकत नसल्याचे राज्यपाल रवि यांनी म्हटले होते. यावर बोलताना तामिळनाडूचे मंत्री रेगुपथी यांनी राज्यपालांना राज्य सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे म्हटले आहे. अण्णाद्रमुकच्या माजी मंत्र्यांच्या विरोधात अमली पदार्थाशी संबंधित गुन्हा नोंद करण्यासाठीची अनुमती राज्यपालांनी एक वर्षापेक्षा अधिक काळापर्यंत रोखून ठेवली होती असा दावा रेगुपथी यांनी केला आहे.
राज्यपाल हे अमली पदार्थांची राजधानी ठरलेल्या गुजरातविषयी का बोलत नाहीत? मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यात ड्रग्स विरोधात धोरण सुरू केले होते. 2023 मध्ये 14,770 जणांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. राज्यपाल हे आकडेवारीशिवाय ड्रग्सच्या मुद्द्यावर बोलत असल्याचा आरोप द्रमुक नेत्याने केला आहे.