तामिळनाडू, मणिपूर अंतिम फेरीसाठी पात्र
वृत्तसंस्था/ अनंतपूर (आंध्रप्रदेश)
78 व्या राष्ट्रीय संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेत तामिळनाडू आणि मणिपूर संघांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेत आपले सर्व सामने जिंकले आहेत.
येथील आरडीटी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या ग गटातील शेवटच्या सामन्यात तामिळनाडूने यजमान आंध्रप्रदेशचा 8-0 अशा गोल फरकाने एकतर्फी पराभव केला. या सामन्यात पहिल्या 45 मिनिटांच्या कालावधीत आंध्रप्रदेशचा खेळ दर्जेदार झाल्याने तामिळनाडूला केवळ एकमेव नोंदविता आला. हा गोल तामिळनाडू संघातील लिजोने केला. मात्र सामन्याच्या उत्तरार्धात तामिळनाडूने आपल्या आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर देत आंध्रप्रदेशची बचावळफळी खिळखिळी केली. के. लिजोने या सामन्यात 4 गोल तसेच नंदकुमार अनंतराजने 2 गोल, हेन्री जोसेफ व रेगन यांनी प्रत्येकी 1 गोल केला. या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात कर्नाटकाने अंदमान-निकोबारचा 11-0 असा एकतर्फी फडशा पाडला. कर्नाटकातर्फे निखिल राज मुरगेशने 4 गोल, रियान विलफ्रेडने 2 गोल तर क्लेटस्, सुर्या, सय्यद अमन, कार्तिक गोविंद स्वामी आणि हॅन्ड्रीव्ह यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला.
आगरतळा येथे झालेल्या या स्पर्धेच्या ड गटातील सामन्यात मणिपूरने त्रिपुराचा 2-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. मणिपूर संघातर्फे लोलीने 73 व्या मिनिटाला तसेच जादावेळेत असे दोन गोल नोंदविले. या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात मिझोरामने सिक्कीमचा 7-0 असा पराभव केला. या विजयामुळे मिझोरामने 3 गुणांसह आपल्या गटात बऱ्यापैकी स्थान मिळविले आहे.