एका आंब्याची किंमत २१० रुपये; तामिळनाडूनच्या आंब्याने दिली सलामी
कोल्हापूर: फळांचा राजा म्हणून ओळखण्यात येणाऱ्या कोकणच्या हापूसची प्रतीक्षा असतानाच सोमवारी कोल्हापूरच्या फळ मार्केटमध्ये तामिळनाडूनच्या आंब्याने सलामी दिली आहे. जानेवारी महिन्यात कोकणच्या हापूसची एन्ट्री होण्याची शक्यता आहे, त्याआधीच दक्षिणेकडील आंब्याने भाव खाल्ला आहे. एक डझनाच्या पेटीला २५०० रुपये इतका दर आला आहे.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या श्री शाहू मार्केट यार्ड फळ मार्केटमध्ये तामिळनाडू हापूसची एक डझनाच्या ४० बॉक्सची सोमवारी आवक झाली. हंगामाच्या सुरुवातीलाच या आंब्याला चांगला दर मिळाला आहे. दाखल झालेल्या या आंब्याची प्रसाद वळंजू यांनी एक डझनचा बॉक्स २ हजार ५०० रुपयांना खरेदी केला. साधारणपणे २०८ रुपये एका आंब्याला आलेली किंमत सर्वाधिक किंमत मानली जाते.
कोकणातून नेलेल्या हापूसच्या रोपांची तमिळनाडूमध्ये लागवड करण्यात आली आहे. वातावरणाचा फायदा झाल्याने तेथील हंगामापूर्वीच आंब्याची फळधारणा झाली आणि बाजारात आवक शक्य झाली, असे खरेदीदार प्रसाद वळंजू यांनी सांगितले. दरवर्षी हापूस आंब्याच्या हंगामाची खवय्ये आतुरतेने वाट पाहतात. यंदा कोकणातील हापूसची आवक सुरू होण्यापूर्वीच तमिळनाडूच्या आंब्याने बाजारात हजेरी लावली आहे. कोकणच्या हापूसची आवक जानेवारीत सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
