मंदिर परिसरात दीपप्रज्वलनाला तामिळनाडू सरकारचा विरोध
उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव : संसदेत द्रमुक खासदारांचा गोंधळ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, चेन्नई
तामिळनाडूच्या अरुलमिघु सुब्रमण्य स्वामी मंदिरात दीप लावण्यावरून चिघळलेला वाद आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने राज्य सरकारच्या वकिलांच्या युक्तिवादाची दखल घेत याला सुनावणीसाठी स्वीकार केले आहे. योग्य खंडपीठासमोर या याचिकेला सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात येईल असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे द्रमुक खासदारांनी या मुद्द्याघ्वर स्वत:चे म्हणणे मांडण्यासाठी संसदेत जोरदार गोंधळ घातला आहे.
लोकसभा अध्यक्षांनी याप्रकरणी टिप्पणी आणि चर्चा करण्यास नकार देत हे प्रकरण न्यायालयात असल्याचे स्पष्ट केले. तरीही द्रमुक खासदारांनी गोंधळ घालणे सुरूच ठेवल्याने संसदेचे कामकाज काही काळासाठी स्थगित करावे लागले. अरुलमिघु सुब्रमण्य स्वामी मंदिराच्या भाविकांना दर्ग्यानजीक शिथरुपरनकुंद्रम पर्वतावरील दगडी दीपस्तंभावर पारंपरिक ‘कार्थिगर्ट दीपम’ लावण्याच्या अनुमतीवरून तामिळनाडूतील राजकीय वातावरण तापले आहे.
या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने गुरुवारी आदेश जारी करत जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांची याचिका फेटाळली होती. तसेच एकल न्यायाधीशाचा आदेश कायम ठेवला होता, ज्यात सुब्रमण्य स्वामी मंदिरात भाविकांना एका दगडी दीपस्तंभावर पारंपरिक कीर्तिगई दीपम दीप लावण्याची अनुमती देण्यात आली होती. हा दीपस्तंभ तिरुपरनकुंड्रूम पर्वतावर एका दर्ग्यानजीक असल्याने राज्य सरकारला याकरता अनुमती नाकारत आहे.
एकल पीठाचा आदेश
भाविकांनी अनुमती मिळावी म्हणून न्यायालयात धाव घेतली होती. 1 डिसेंबर रोजी न्यायाधीश जे.आर. स्वामिनाथन यांच्या एकल पीठाने आदेश देत अरुलमिघु सुब्रमण्य स्वामी मंदिर उच्चि पिल्लोयार मंडपमनजीक होणाऱ्या दीपप्रज्वलनासोबत दीपथून स्तंभावरही दीप लावण्याची मंजुरी दिली होती. दीप लावल्याने नजीकचा दर्गा किंवा मुस्लीम समुदायाच्या अधिकारांचे कुठलेच उल्लंघन होत नाही असे न्यायालयाने म्हटले होते. परंतु हा आदेश लागू न झाल्याने 3 डिसेंबर रोजी एकल न्यायाधीशाने आणखी एक आदेश देत भाविकांना स्वत:च दीप लावण्याची अनुमती दिली आणि सीआयएसएफला त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचा निर्देश दिला.
भाजप नेत्यांचा दीप लावण्याचा प्रयत्न
न्यायालयाच्या आदेशानंतर तामिळनाडू भाजप अध्यक्ष नैनार नागेंद्रन यांनी अन्य हिंदुत्ववादी नेत्यांसोबत मिळून पर्वतावर जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनुसार नागेंद्रन आणि याचिकाकर्ते राम रवि कुमारसमवेत अन्य लोक स्पष्टपणे अनुमती नसतानाही दीपप्रज्वलनासाठी पर्वतावर जाण्याचा प्रयत्न करत होते.
उच्च न्यायालयात प्रकरण
मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने गुरुवारी एकल न्यायाधीशाच्या आदेशाच्या विरोधात दाखल याचिका फेटाळील होती. यानंतरच नैनार आणि अन्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते पर्वतावर जाण्यासाठी एकत्र आले होते. उच्च न्यायालयाने जमावबंदीच आदेश रद्द करत पोलिसांना याचिकाकर्ता राम रविकुमार यांना दीपप्रज्वलन करण्यासाठी पूर्ण सुरक्षा प्रदान करण्याचा निर्देश दिला होता. सांप्रदायिक सौहार्दाचा अर्थ कुणाला रोखणे किंवा बंदी घालणे नाही, तर परस्पर समज आणि मिळून राहण्याविषयी असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली होती.
स्टॅलिन सरकारची याचिका
एकल न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला आहे. सरकार या मुद्द्याला उच्च न्यायालयासमोर नेण्यापासून टाळण्यासाठी अनावश्यक ड्रामा करत असल्याचा आरोप प्रतिवादी पक्षाने केला आहे.