तामिळनाडूत एक्स्प्रेसची मालगाडीला धडक
तिऊवल्लूरमध्ये मोठा रेल्वे अपघात; दोन बोगीत आग : चेन्नईजवळ दुर्घटना
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूतील तिऊवल्लूर जिह्यातील कावरपेट्टई रेल्वेस्थानकावर म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसली. शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मालगाडीला धडकल्यानंतर दरभंगा एक्स्प्रेसचे सहा डबे ऊळावरून घसरले. तसेच अपघातानंतर दरभंगा एक्स्प्रेसच्या दोन बोगींना आग लागल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर टेनमधील प्रवाशांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होती. प्राथमिक टप्प्यात या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ही धडक इतकी जोरदार होती की आवाज दूरपर्यंत ऐकू आला. या धडकेनंतर स्थानकातही गोंधळ उडाला. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू होते.
प्राथमिक माहितीनुसार, दरभंगा एक्स्प्रेसने स्टेशनवर उभ्या असलेल्या मालगाडीला मागून धडक दिली. अपघाताच्या वेळी एक्स्प्रेस टेनचा वेग किती होता याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. अपघातानंतर रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. मदत आणि बचावकार्यही सुरू करण्यात आले. या घटनेनंतर आता ऊळावर मालगाडी आधीच उभी असताना त्या ऊळावर एक्स्प्रेस कशी आली? लाईनमनच्या बाजूने काही चूक होती की अन्य कारणामुळे अपघात झाला? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.