तामिळनाडू ड्रॅगन्स जेएसडब्ल्यू सुरमा क्लबला नमवून अव्वल स्थानी
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडू ड्रॅगन्सने येथे जेएसडब्ल्यू सुरमा क्लबवर 3-2 असा संघर्षपूर्ण विजय मिळवून पुऊष हॉकी इंडिया लीगच्या गुणतालिकेत 5 गुणांनिशी अव्वल स्थान पटकावले. सामन्याच्या बहुतांश भागात वर्चस्व गाजवणाऱ्या ड्रॅगन्सला शेवटच्या क्षणी सुरमाने जोरदार प्रत्युत्तर दिल्याने कडवी झुंज द्यावी लागली, परंतु यजमानांनी आपला बचाव कायम ठेवत एक महत्त्वाचा विजय मिळवला.
सेल्वराज कनगराज (28 व्या मिनिटाला), उत्तम सिंग (30 व्या मिनिटाला) आणि ब्लेक गोव्हर्स (47 व्या मिनिटाला) यांनी ड्रॅगन्ससाठी गोल केले, तर मनिंदर सिंग (45 व्या मिनिटाला) आणि कर्णधार हरमनप्रीत सिंग (58 व्या मिनिटाला) यांनी सुरमाला शेवटच्या क्षणापर्यंत सामन्यात टिकवून ठेवले. दोन्ही संघांनी एकमेकांना रोखल्यामुळे पहिला टप्पा गोलशून्य बरोबरीत संपला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात 28 व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल झाला. यावेळी चंदन यादवने उजवीकडून दिलेल्या अचूक पासवर सेल्वराज कनगराजने चेंडू जाळ्यात टाकला. या गोलमुळे ड्रॅगन्सला गती मिळाली आणि त्यांनी मध्यंतरापूर्वी पुन्हा एकदा गोल केला. सुरमाच्या गुरजंत सिंगला हिरवे कार्ड दाखवल्यानंतर काही क्षणांतच 30 व्या मिनिटाला उत्तम सिंगने एका उत्कृष्ट रिव्हर्स हिटने गोल करून संघाची आघाडी 2-0 अशी केली.
तिसऱ्या सत्रामध्ये विश्रांतीनंतर सुरमाने अधिक त्वेषाने खेळ केला. आपल्या वाढदिवशी खेळणाऱ्या कर्णधार हरमनप्रीत सिंगने 36 व्या मिनिटाला संघासाठी पहिला पेनल्टी कॉर्नर मिळवला, पण तो गोलमध्ये बदलण्यात अपयश आले. त्यानंतर आकाशदीप सिंगने एका अवघड कोनातून गोल करण्याचा प्रयत्न केला, पण तो थोडक्यात चुकला. ड्रॅगन्स संघाने बचावाच्या बाबतीत शिस्तबद्ध खेळ केला. सुरमा संघाला गोल करण्याची सर्वोत्तम संधी 42 व्या मिनिटाला मिळाली. त्यावेळी विवेक प्रसादने गोलक्षेत्रात जागा मिळवली, पण ड्रॅगन्सचा गोलरक्षक डेव्हिड हार्टने एक उत्कृष्ट बचाव केला.
या सत्राच्या शेवटच्या काही सेकंदात नाट्यामय घडामोडी घडून ड्रॅगन्सच्या नॅथन एफ्रामसने केलेला गोल बॅक-स्टिकमुळे अवैध ठरवण्यात आला. त्यातून मिळालेल्या फ्री हिटवर हरमनप्रीतने चेंडू गोलक्षेत्रात उंच फटकावला आणि आदळून चेंडू मनिंदर सिंगकडे आला, ज्याने केवळ एक सेकंद शिल्लक असताना गोल केला. रेफरलनंतर गोल वैध ठरला आणि गोलफरक 2-1 असा कमी झाला.
सुरमा संघाने हीच गती अंतिम सत्रात कायम ठेवली आणि आक्रमण सुरूच ठेवले. हार्टची पुन्हा एकदा कसोटी लागून तो आपल्या जागेवर ठाम राहिला. मात्र ड्रॅगन्सने निर्णायक गोल केला, जेव्हा टॉम क्रेगने खोलवर जाऊन एक उत्कृष्ट धाव घेतली आणि ब्लेक गोव्हर्सला अचूक पास दिला. त्याने 47 व्या मिनिटाला शांतपणे गोल करून आघाडी 3-1 अशी केली. तरीही सुरमा संघाने हार मानली नाही आणि सामन्याच्या शेवटच्या क्षणी सलग पेनल्टी कॉर्नर मिळवले. 56 व्या मिनिटाला रोहिदासने हरमनप्रीतचा प्रयत्न रोखला आणि त्यानंतर लगेचच हार्टने आणखी एक प्रयत्न वाचवला. हरमनप्रीतने अखेरीस 58 व्या मिनिटाला एका जोरदार ड्रॅग-फ्लिकद्वारे गोल करून गोलसंख्या 3-2 अशी केली. शेवटची काही मिनिटे तणावपूर्ण होती, कारण सुरमा संघाने आणखी दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले, परंतु ड्रॅगन्सचा बचाव मजबूत राहिला.