Rahul Gandhi Joseph Vijay Poster "५९ वर्षानंतर तमिळनाडूमध्ये पुन्हा काँग्रेस धन्यवाद थलैवा" राहुल गांधी, जोसेफ विजय यांच्या पोस्टरची दिल्लीत चर्चा
तमिळनाडूच्या राजकारणात नव्याने आलेल्या आणि आपल्या दमदार प्रवेशाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेल्या जोसेफ विजय यांच्या चर्चा अजूनही राजकारणाच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसते. नुकतेच तामिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय दिल्ली दौरा पूर्ण करून चेन्नईला परतले आहेत.
मुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रीय राजधानीच्या आपल्या पहिल्या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान मोदी आणि निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. मात्र, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासोबत नियोजित भेट असूनही, मुख्यमंत्री विजय लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची भेट न घेताच चेन्नईला परतले. ही भेट का झाली नाही याबद्दल अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत
राहुल गांधी आणि जोसेफ विजय यांचे पोस्टर
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय या दोन नेत्यांची भेट झाली नसली तरी, नवी दिल्ली येथील १० जनपथ येथे दोन्ही नेत्यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये राहुल गांधी आणि टीव्हीके प्रमुख विजय हातात हात घालून एकत्र दिसत आहेत. सोनिया गांधींच्या निवासस्थानाबाहेर ज्या पद्धतीने हे पोस्टर लावण्यात आले आहेत, त्यातून बरेच काही सूचित होते. हे पोस्टर एक विशिष्ट संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे.

धन्यवाद थलैवाचा संदेश
१० जनपथच्या बाहेर लावलेल्या या पोस्टरवर काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपथी विजय यांचा फोटो आहे. त्यावर लिहिले आहे, "५९ वर्षांनंतर तामिळनाडूमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली आहे. धन्यवाद, थलायवा." बुधवारी थलपथी विजय यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान हे पोस्टर समोर आले.
दिल्ली दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तामिळनाडूचे मुख्यमंत्री लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांना भेटतील अशी अपेक्षा होती. मात्र, ही भेट झाली नाही. मुख्यमंत्री विजय चेन्नईला परतले. मुळात विजय यांचा राहुल गांधी यांच्याशी भेटीचा नियोजित दौरा असताना ही भेट का झाली नाही? याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
सत्तास्थापनेवेळी काँग्रेसची मदत
तमिळनाडूमध्ये निवडणूकीमध्ये रंगलेले सत्तास्थापनेचे नाट्य देशभरात चर्चिले जात होते. विजय यांच्या TVK पक्षाला स्पष्ट बहुमत नसतानाही, टीव्हीकेला काँग्रेसकडून पाठिंबा मिळाला. डीएमकेसोबत युती असूनही, काँग्रेसने थलपथी विजय यांना आपला पाठिंबा त्वरित जाहीर केला. यानंतर DMK ने काँग्रेसच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांची दिल्लीत भेट न झाल्याने, काँग्रेस-टीव्हीकेमध्ये सर्व काही आलबेल आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
विजयने दिल्ली दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी आणि सीतारामन यांची भेट घेतली.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी बुधवारी नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि राज्याच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.
मुख्यमंत्री विजय यांनी अर्थ मंत्रालयाच्या कार्यालयात सीतारामन यांची सदिच्छा भेट घेतली आणि तामिळनाडूच्या पायाभूत सुविधा, शिक्षण, वाहतूक आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित अनेक मोठ्या प्रकल्पांसाठी केंद्रीय मदतीची मागणी केली. यापूर्वी, मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. त्या भेटीत त्यांनी तामिळनाडूशी संबंधित अनेक संवेदनशील आणि महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.