कोनाळच्या खुल्या भजन स्पर्धेत तांबोळी स्वरधारा प्रासादिक मंडळ प्रथम
दोडामार्ग – वार्ताहर छाया – समीर ठाकुर
श्री. कुलदेवता खंडेराय भवानी प्रासादिक भजन मंडळ, कोनाळ यांच्यावतीने आयोजित खुल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ, तांबोळी यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत स्वराभिषेक प्रासादिक भजन मंडळ, मणेरी यांनी द्वितीय तर श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी (ता. कुडाळ) यांनी तृतीय क्रमांक मिळवला.शनिवारी शिवसेना पदाधिकारी तथा युवा उद्योजक शैलेश दळवी, शिवसेना विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रेमानंद देसाई, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस, एम. आर. नाईक विद्यालय कोनाळकट्टाचे माजी मुख्याध्यापक संतोष घोगळे, रंगनाथ गवस आणि सेवानिवृत्त अधिकारी रामा ठाकूर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून या दोन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिक्षक उदय गवस, हनुमंत गवस, सुभाष लोंढे व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली.या स्पर्धेत एकूण ९ भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. दोन दिवस चाललेल्या या भजनी स्पर्धेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. प्रत्येक मंडळाने आपल्या सुमधुर भजनांनी उपस्थितांची मने जिंकली आणि रसिकांची वाहवा मिळवली.या स्पर्धेतील विजेत्या मंडळांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. उत्तेजनार्थ पारितोषिक श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ, कलंबिस्त (ता. सावंतवाडी) यांना प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. आर. नाईक विद्यालय कोनाळकट्टाचे मुख्याध्यापक विश्वनाथ सावंत यांनी केले, तर कोनाळ भजन मंडळाचे अध्यक्ष सुभाष लोंढे यांनी आभार मानले.