Tambda Pandhara Rassa: तांबडा-पांढऱ्या रश्श्यासाठी देशव्यापी मोहिमेची गरज का आहे?
कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीत तांबडा, पांढरा रस्सा हे अनोखे पदार्थ आहेत
By : इंद्रजीत गडकरी
कोल्हापूर : दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत कुठेही गेलात, तरी पंजाबी ढाबा, साऊथ इंडियन सेंटर सहज सापडतील. पण, कोल्हापूरचा खास तांबडा आणि पांढरा रस्सा किंवा कोल्हापुरी जेवण देशभर अजूनही फारसे पोहोचलेले नाही, ही खरोखरच खंत आहे.
कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीत तांबडा, पांढरा रस्सा हे अनोखे पदार्थ आहेत. गरम मसाल्याचा झणझणीत तडका, विशेष तिखट यामुळे तांबडा रस्सा तोंडाला पाणी आणतो. पांढरा रस्सा नारळाच्या दुधामध्ये केलेला सौम्य चव असलेला आहे. दोन्ही रस्स्यांसह मटनाचे विशेष पदार्थ ही कोल्हापूरची शान आहे.
कोल्हापूरात कोणत्याही हॉटेलमध्ये गेलें, की तांबडा-पांढरा रस्सा अनिवार्य. मटन थाळी म्हणजे तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, झणझणीत सुकं मटण, भाकरी. ते इतकं चविष्ट आहे, की एकदा खाल्लं, की त्याची चव विसरत नाही. दुर्दैवाने ही चव अजून राज्याबाहेर पोहोचलेली नाही.
परदेशातही बाजारपेठ मोठी
परदेशात भारतीय जेवणाला प्रचंड मागणी आहे. इंडियन स्पायसी फूड म्हणून कोल्हापुरी रस्स्याला मोठी बाजारपेठ मिळू शकते. त्यासाठी विशेष रेडी-टु-ईट रस्सा, मसाला पॅकेट्द्वारे निर्यात वाढवता येऊ शकते.
पुढाकार घेण्याची वेळ
फ्रेंचायजी मॉडेल वापरून कोल्हापूरच्या शेफ्सना देशभर संधी दिली तर रोजगाराचीही मोठी शक्यता आहे. ‘लोकल फॉर व्होकल’ किंवा ‘मेड इन इंडिया’ संकल्पना जोरात आहेत. अशावेळी कोल्हापूरच्या तांबडा-पांढऱ्या रस्स्याचं देशासह परदेशातही मार्केटिंग करणे काळाची गरज आहे. कोल्हापुरात लाखो पर्यटक येतात आणि रस्स्याची चव चाखून जातात, तशीच चव त्यांना त्यांच्या गावातही मिळाली पाहिजे, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
तांबडा-पांढऱ्या रस्स्याचा झणझणीत ठसका देशभर पोहोचवूया
"तांबडा-पांढरा रस्सा फक्त खाद्यपदार्थ नाही तर कोल्हापूरच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. कोल्हापूरची ओळख ही फक्त चप्पल किंवा कुस्तीपुरती मर्यादित नसून, रस्स्याचं झणझणीत वैशिष्ट्या देखील देशभर पोहोचवणे आता अत्यंत गरजेचे आहे. कोल्हापुरी पाण्याचा गोडवा या रस्स्यात उतरलेला असतो, त्यामुळे याची चव देशात पोहचली पाहिजे."
- किरण पाटोळे, राजधानी हॉटेल, कोल्हापूर
खाद्यसंस्कृतीचा अभिमान देशभर पोहोचला पाहिजे
कोल्हापूरकर म्हणून आपल्या खाद्यसंस्कृतीचा अभिमान वाटणं स्वाभाविक आहे, पंजाबी, गुजराती, दक्षिण भारतीयांनी त्यांच्या खाद्यसंस्कृतीला देशभर पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले, तसेच प्रयत्न कोल्हापूरकरांनाही करावे लागतील.
कोल्हापूरच्या रस्स्याची चव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी हॉटेल व्यावसायिक, शेफ, फूड ब्लॉगर्स, स्थानिक प्रशासनाने पुढाकार घ्यायला हवा. फूड फेस्टिव्हल्समध्ये कोल्हापुरी रस्सा, मटण थाळींचे स्टॉल्स, सोशल मीडियावर मोहिमा राबवणे गरजेचे आहे.