Tambda Pandhra Rassa: ‘हम तो इसके दिवाने हो गए...’, मेहमुद, किशोर कुमारही होते तांबड्या-पांढऱ्याचे दिवाने!
हॉटेल आयोध्या येथे या दिग्गज कलाकारांनी रश्यावर ताव मारला होता
By : इम्रान गवंडी
कोल्हापूर : ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक वैभव आणि मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेला चवीचा अनोखा ठेवा म्हणून नावलौकीक मिळवलेला कोल्हापुरच्या तांबडा-पांढरा रस्सा खवय्यांच्या मनात आजही विशेष स्थान राखून आहे.
साधारणत: 80 च्या दशकात चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कोल्हापुरात आलेल्या मेहमुद, किशोर कुमार, गोगा कपुर व असरानींनी तांबड्या-पांढऱ्या रस्स्याची चव चाखली होती. तेव्हा ‘हम तो इसके दिवाने हो गए...’ अशा शब्दात प्रशंसाही केली होती. हॉटेल आयोध्या येथे या दिग्गज कलाकारांनी रश्यावर ताव मारला होता.
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांपासून ते मराठी अभिनेते, राजकारणी आणि क्रिकेटपटूंनाही याची भुरळ पडली आहे. मराठी चित्रपटातील कॉमेडीचे बादशाह दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे, उषा चव्हाण, निशिगंधा वाड यांसारख्या सिनेकलाकारांनी कोल्हापूरला भेट दिल्यावर या तांबडा-पांढऱ्या रस्स्यासोबत मटणाचा आस्वाद घेतला आहे.
त्याचबरोबर सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन, मनोज प्रभाकर यांसारख्या क्रिकेटपटूंनीही तांबड्या-पांढऱ्याची चव चाखली आहे. जेंव्हा जेंव्हा कोल्हापुरला कामानिमित्त येतात तेंव्हा पांढऱ्या तांबड्यावर ताव मारूणच जातात, हे एक समिकरन बनले आहे.
सेलिब्रिटींची आवड कोल्हापूरच्या या रस्स्याची ख्याती इतकी आहे की, देशभरातील सेलिब्रिटी याचा आस्वाद घेण्यासाठी खास कोल्हापूरला भेट देतात. कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना मोहम्मद अझरुद्दीन, मनोज प्रभाकर, सचिन तेंडूलकर यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनीही स्थानिक हॉटेल्समध्ये तांबडा रस्सा आणि मटणाचा आनंद लुटला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील हास्यसम्राट महमूद यांनी कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीचं कौतुक केलं होतं. मराठी चित्रपटसृष्टीतील हास्याचे बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, दादा कोंडके, दिग्दर्शक-अभिनेता महेश कोठारे यांनीही कोल्हापूरच्या गल्लीबोळातील हॉटेल्समध्ये तांबडा-पांढरा रस्सा आणि मटणावर ताव मारला आहे.
कोल्हापुरी खाद्यसंस्कृतीचा आत्मा
तिखट, मसालेदार व चटकदार चवीची कोल्हापूरची खाद्यसंस्कृती ओळखली जाते. तांबडा व पांढरा रस्सा हे मटण किंवा चिकनसोबत सर्व्ह केले जाणारे दोन पारंपरिक पदार्थ आहेत. तांबडा रस्सा हा लाल रंगाचा, तिखट व मसाल्यांनी युक्त असतो, जो कोल्हापुरी मिरच्यांच्या तीव्र चवीने तयार होतो.
तर पांढरा रस्सा हा खोबरं, काजू आणि पांढऱ्या मसाल्यांनी बनलेला, क्रीमी आणि सौम्य चवीचा असतो. या दोन्ही रस्स्यांचा समतोल आणि त्यासोबत मटण किंवा चिकनची लज्जत खवय्यांना वेड लावते.
तांबडा-पांढऱ्या रस्स्याचं सांस्कृतिक महत्त्व
तांबडा-पांढरा रस्सा केवळ एक पदार्थ नाही, तर तो कोल्हापुरी अस्मितेचा आणि आतिथ्याचा एक भाग आहे. आणि तो प्रत्येंक हॉटेलमध्ये अनलिमिटेड दिला जातो.
आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक
कोल्हापुरी पांढऱ्या रस्स्याची चव इतकी न्यारी आहे की प्रत्येकाच्या मनात घर करून जाते. शिवाय रस्सा पिल्यानंतर कोणताही त्रास होत नाही. याउलट यामध्ये भरपुर प्रोटीन्स असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही लाभदायक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. केवळ मटान शिजवून त्यातील पाण्याचा अर्क काढून हा रस्सा बनवला जातो. त्यामुळे प्रत्येकजण दोन तीन वाट्या हाणतोच... मात्र, यामध्ये कोणतीही भेसळ नसावी.
लज्जतदार रस्स्याला वेगळी उंची
"कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा हा केवळ खाद्यपदार्थ नसून, एक सांस्कृतिक अनुभव आहे. याची चव घेण्यासाठी क्रिकेटपटू, अभिनेते, राजकारणी आणि सामान्य खवय्ये यांच्यासह सगळेच उत्सुक असतात. सिनेअभिनेता मेहमुद, असरानी, दादा कोंडके, लक्षीकांत बेर्डे, किशोर कुमार यांनी आवर्जुन रस्स्याची चव घेतली आहे. यामुळे कोल्हापुरच्या रस्स्याला वेगळी उंची मिळाली आहे."
- सचिन शानभाग, मालक, हॉटेल आयोध्या, कोल्हापूर
तांबडा-पांढऱ्या रस्स्याचा ठसका देशभर पोहोचवूया
"तांबडा-पांढरा रस्सा फक्त खाद्यपदार्थ नाही तर कोल्हापूरच्या संस्कृतीचा अविभाज्य माग आहे. रस्स्याचं झणडाणीत वैशिष्टय देखील देशमर पोहोचवणे आता अत्यंत गरजेचे आहे."
- किरण पाटोळे, राजधानी हॉटेल, कोल्हापूर