‘पुरुषन’मध्ये तमन्ना भाटिया
योगी बाबू अन् विशालसोबत झळकणार
अभिनेता विशाल, तमन्ना भाटिया आणि दिग्दर्शक सुंदर सी हे पुन्हा एकत्र काम करणार आहेत. त्यांच्या नव्या चित्रपटाचे नाव ‘पुरुषन’ असून याचा टीझरही सादर करण्यात आला आहे. या चित्रपटाची कहाणी अॅक्शनने भरपूर असून अभिनेता विशालची भूमिका एक शांत अन् आज्ञाधारक पतीची असून तो घरातील सर्व कामे करतो. परंतु त्याच्या आत लपलेला एक हिंसक आणि अॅक्शनयुक्त इसम असून त्याविषयी त्याची दबंग पत्नी (तमन्ना) अनभिज्ञ असते.
या चित्रपटाची निर्मिती एसीएस अरुण कुमार यांनी बेन्ज मीडियाच्या अंतर्गत केली आहे. यात खुशबू सुंदरही दिसून येणार आहे. तर चित्रपटाला संगीत हिपहॉप तमिझाने दिले आहे. या चित्रपटात योगी बाबूची भूमिका असल्याने याला विनोदी स्पर्श देण्यात आल्याचे मानले जात आहे. हा विशाल आणि सुंदर सी यांचा एकत्रित चौथा चित्रपट आहे. यापूर्वी त्यांनी ‘आंबला’, ‘अॅक्शन’ आणि ‘मधा गज राजा’ यासारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. विशाल-सुंदर सी या हिट जोडीच्या चित्रपटाची चाहते प्रतीक्षा करत असतात. तर तमन्नाचे चाहते तिच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत आहेत.