आंदोलनाच्या धसक्याने ग्रामपंचायत आली ताळ्यावर; तामलवाडी येथील 50 दिव्यांगांना निधीचे वाटप
दिव्यांगांच्या प्रयत्नाला अखेर यश
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील ग्रामपंचायतने आत्तापर्यंत दिव्यांग बांधवाना एक रुपयाही निधीचे वाटप केलेले न्हवते. वारंवार मागणी करुनही दिव्यांग बांधवांच्या मागणीकडे ग्रामपंचायतने दुर्लक्ष केले होते. नीती आयोगाच्या प्रतिनिधीकडे याची दादा मागून ग्रामपंचायतच्या गैरकारभाराचे पितळ दिव्यांग बांधवांनी उघडे पाडले होते. अखेर उशीरा का होईना ग्रामपंचायतला जाग आली असुन तामलवाडी तामलवाडी दिव्यांग 50 व्यक्तींना ग्रामपंचायतच्या वतीने अपंग कल्याण निधीचे वाटप करण्यात आले.
जागतिक दिव्यांग दिनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा दिव्यांग प्रतिनिधी सचिन शिंदे यांनी दिला होता. याची दखल घेत ग्रामपंचायतने अखेर निधीचे वाटप केले. सरपंच नुरबानू बेगडे, उपसरपंच सुधीर पाटील, ग्रामसेवक चैतन्य गोरे आणि सर्व सदस्य, उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते रविवारी जागतिक अपंग दिनी दिवशी 50 हजार रुपयाचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीला मिळणार्या कर उत्पन्नातून दिव्यांग कल्याण निधी पाच टक्के वाटप करणे बंधनकारक आहे. मात्र तो निधी गेल्या पाच वर्षापासून वाटप केला नसल्याने प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने भिक मांगो आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. यामुळे तामलवाडी ग्रामपंचायतीने तात्काळ दखल घेवून आर्थिक नियोजन करून रविवारी जागतिक अपंग दिनी पन्नास हजार रुपयांचा अपंग कल्याण निधी दिव्यांगांना वितरीत केला. या कार्यक्रमास ग्रामसेवक चैतन्य गोरे, उपसरपंच सुधीर पाटील, पत्रकार अविनाश गायकवाड आदींसह प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे अनेक सदस्य उपस्थित होते. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन व आभार सर्जेराव गायकवाड यांनी मानले.