तमाल युद्धनौका भारतीय नौदलात सामील
ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी सज्ज : रडारला चकवा देण्यास सक्षम
वृत्तसंस्था/ मॉस्को
भारतीय नौदलाला अत्याधुनिक स्टील्थ फ्रीगेट ‘आयएनएस तमाल’ प्राप्त झाली आहे. आयएनएस तमाल या युद्धनौकेला रशियाच्या कॅलिनिनग्राडमध्ये भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आले. हा सोहळा व्हाइस अॅडमिरल संजय जे. सिंह यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी पार पडला आहे.
तमाल ही रशियाकढून मिळालेली आठवी तर तुशील श्रेणीतील दुसरी युद्धनौका आहे. 2016 मध्ये भारत-रशिया संरक्षण कराराचा ही युद्धनौका हिस्सा आहे. या कराराच्या अंतर्गत 4 तलवार श्रेणीच्या स्टील्थ फ्रीगेट निर्माण केल्या जात आहेत. यातील दोन रशियाच्या यंतर शिपयार्डमध्ये तर दोन गोवा शिपयार्डमध्ये निर्माण केल्या जात आहेत.
तमाल युद्धनौकेला रशियाच्या यंतर शिपयार्डमध्ये भारतीय तज्ञांच्या देखरेखीत तयार करण्यात आले आहे. यात 26 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान सामील आहे. ही युद्धनौका 30 नॉट्स (55 किलोमीटर प्रतितास) पेक्षा अधिक वेगाने समुद्रात प्रवास करू शकते आणि समुद्रातून आकाशापर्यंत हल्ला करण्याची क्षमता राखून आहे. आयएनएस तमाल युद्धनौकेवर ब्राह्मोस क्षेपणास्त्रs तैनात करण्यात आली आहेत. ही युद्धनौका रडारला चकविण्यास सक्षम आहे. तसेच तमाल युद्धनौकेला नौदलाच्या पश्चिम ताफ्यात सामील करण्यात येणार आहे. तेथून अरबी समुद्र-हिंदी महासागरात ती तैनात होईल आणि पाकिस्तानच्या सागरी हालचालींवर करडी नजर ठेवणार आहे.
इंद्रदेवाच्या तलवारीचे मिळाले नाव
या युद्धनौकेची खास बाब याचे नाव अन् प्रतीक आहे. ‘तमाल’ हे इंद्रदेवाच्या पौराणिक तलवारीचे नाव आहे आणि प्रतिकात्मक ओळख ‘जांबवंत’ आणि रशियन अस्वलाने प्रेरित ‘ग्रेट बेयर्स’ आहे. तमाल युद्धनौका भारतीय आणि रशियन सहकार्याचे प्रतीक आहे.
भारतीय नौसैनिकांना प्रशिक्षण
200 हून अधिक भारतीय नौसैनिकांनी या युद्धनौकेचे संचालन आणि तांत्रिक प्रणालीसाठी रशियात प्रशिक्षण घेतले आहे. तमाल युद्धनौकेच्या सागरी परीक्षणातही त्यांनी भाग घेतला आहे.
गोव्यात आणखी दोन युद्धनौकांची निर्मिती
भारत-रशिया कराराच्या अंतर्गत दोन अन्य तलवार श्रेणी स्टील्थ फ्रीगेट गोवा शिपयार्डमध्ये निर्माण केल्या जात आहेत. त्यांच्यासाठी आवश्यक इंजिन यापूर्वीच मागविण्यात आले आहे. यामुळे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक मोठे पाऊल पडल्याचे मानले जात आहे.