For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मतदानासाठी खानापूरसह तालुका सज्ज

10:48 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
मतदानासाठी खानापूरसह तालुका सज्ज
Advertisement

पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्रे मतदान केंद्रांकडे रवाना : खानापूर क्षेत्रात 312 मतदान केंद्रे : बंदोबस्तासाठी 800 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Advertisement

खानापूर : कारवार मतदारसंघातील खानापूर मतदार क्षेत्रात निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून सोमवारी दुपारी खानापूर मतदार क्षेत्रातील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन घेऊन कर्मचारी पोलीस बंदोबस्तात रवाना झाले आहेत. तालुक्यातील 312 मतदान केंद्रांवर कर्मचारी पोहचले असून मंगळवारी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. कारवार लोकसभा निवडणुकीत खानापूर विधानसभा मतदान क्षेत्रात एकूण 312 मतदान केंद्रे आहेत. यात सखी मतदान केंद्र म्हणून प्रभूनगर आणि लोंढा या मतदान केंद्रांची निवड करण्यात आली असून युवा मतदान केंद्र म्हणून केरवाड तर विशेष मतदान केंद्र म्हणून लक्केबैल आणि देवलत्ती येथे मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच आदर्श मतदान केंद्र म्हणून हेब्बाळ येथे मतदान केंद्र उभारण्यात आले आहे.

मतदानासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून बैलहोंगल विभागाचे डीवायएसपी यांच्या नेतृत्वाखाली 800 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात 3 पोलीस निरीक्षक, 5 उपनिरीक्षक, 19 सहाय्यक उपनिरीक्षक तर 59 हवालदार तर 250 पोलीस, 120 होमगार्ड तसेच गुजरात आणि कर्नाटक राज्य राखीव सशस्त्र पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील संवेदनशील आणि अतीसंवेदनशील अशा मतदान केंद्राच्या ठिकाणी वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर 6 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण 312 मतदान केंद्रांसाठी 1872 कर्मचाऱ्यांना सकाळी खानापूर येथील सिद्धिविनायक इंग्रजी शाळेच्या पटांगणावर एकत्रिकरण केल्यानंतर सहाय्यक निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण, तहसीलदार प्रकाश गायकवाड, स्वीप कमिटीच्या अध्यक्षा भाग्यश्री जहागीरदार यांच्या निदर्शनाखाली निवडणूक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन तसेच निवडणुकीचे साहित्य देवून पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले आहे. तालुक्यातील 312 मतदान केंद्रांत 16 विभाग बनवण्यात आले असून 37 बस, 35 टेंपो आणि 31 क्रूझर या वाहनातून कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत. मंगळवारी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. सकाळी 6.45 वाजता प्रथम मॉक पोलिंग करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.