ता. पं.-जि. पं. निवडणुका मेमध्ये?
सत्ताधारी पक्षातून चर्चा सुरू, 29 ला चित्र स्पष्ट होणार
बेळगाव : मागील चार वर्षांपासून रेंगाळलेल्या तालुका पंचायत व जिल्हा पंचायतींच्या निवडणुका घेण्यासाठी सरकारचा विचार सुरू असून, त्या अनुषंगाने तयारी चालविली असल्याचे वृत्त हाती आले आहे. एप्रिल किंवा मे मध्ये निवडणुका होतील, असा अंदाज आहे. सत्ताधारी पक्षातून निवडणुका संदर्भात चर्चा सुरू असून, न्यायालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर निवडणुकांच्या तारखा निश्चित करण्यात येतील. आम्ही तरी निवडणुकांसाठी तयारीत आहोत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चार दिवसांपूर्वी म्हटले होते. आता 29 जानेवारी रोजी सरकार स्पष्ट मत व्यक्त करणार आहे. सरकारने तालुका व जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांसाठी हाती घेतलेले कार्यक्रम न्यायालयासमोर मांडणार असून निवडणुकांसाठी अनुकूल वातावरण निर्मिती, अर्थसंकल्पात निधीची तरतूद यासारख्या बाबी सत्ताधारी पक्षासमोर आहेत.
मार्चमध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. तत्पूर्वी होणारे अर्थसंकल्प अधिवेशन पूर्ण होताच त्याच्या पुढील आठवड्यात निवडणुका घेण्याबाबत चर्चा होईल असे काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी म्हटले. तालुका व जि. पं. चा कार्य कालावधी पूर्ण झाला असला तरी, अद्याप निवडणुका झालेल्या नाहीत, असा आरोप करीत निवडणूक आयोगाने न्यायालयात खटला दाखल केला होता. न्यायालयात सुनावणीची वेळ आल्यानंतर सरकारने काही दिवसांची मुदत मागितली होती. त्याचबरोबर निवडणुका घेण्यासाठी आरक्षण व भौगोलिक सीमा निर्धार करणे यासारख्या बाबी पूर्ण करण्याचे कार्य सध्या जलदगतीने सुरू आहे. मार्च-एप्रिलमध्ये बहुतांशी परीक्षा झालेल्या असतात. एप्रिलमध्ये निवडणुकीची घोषणा केल्यास मेमध्ये अंतिम प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल. त्यामुळे मेमध्ये निवडणुका घेणे योग्य होईल या निर्णयापर्यंत सरकार आले आहे.
तालुका पंचायत व जिल्हा पंचायतीच्या संख्या, जागा व एकूण मतदार
- तालुका पंचायत- 239
- जागा - 3903
- जिल्हा पंचायत -31
- जागा -1083
- एकूण मतदार - सुमारे 3 कोटी