शेतकऱ्यांच्या आंदोलनाला तालुका म. ए. समितीचा पाठिंबा
बैठकीत निर्धार : 4 रोजी आंदोलन
बेळगाव : मच्छे हेस्कॉम कार्यालय अंतर्गत येणाऱ्या मच्छे, वाघवडे, संतिबस्तवाड, कर्ले, किणये, बाळगमट्टी आदी भागात वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे शेतीपिकांना पाणी देणे अडचणीचे ठरत आहे. दिवसा सात तास थ्री-फेज वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून हेस्कॉम कार्यालयावर आंदोलन छेडले जाणार आहे. सद्यस्थितीत दिवसा पाच तास आणि रात्रीच्या वेळी 10 ते 12 च्या दरम्यान दोन तास थ्री-फेज वीजपुरवठा केला जात आहे. पण रात्रीच्या वेळी केला जाणारा वीजपुरवठा हा शेतकऱ्यांना उपयुक्त ठरत नसल्याने दिवसा सलग सात तास थ्री-फेज वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. तसेच रात्री या भागात वीजपुरवठा नसल्याने शेतकऱ्यांसह शाळकरी मुले, जनावरे या सोबत पोल्ट्री व्यावसायिकांची गैरसोय होऊ लागली आहे. मोठे नुकसान होत असल्यामुळे किमान रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीजपुरवठा केला जावा या मागणीसाठी शेतकऱ्र्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, दि. 4 फेब्रुवारी रोजी मच्छे हेस्कॉम कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता बेमुदत आंदोलन छेडले जाणार आहे.
आंदोलनात सहभागी व्हा
तरी या भागातील शेतकरी आणि नागरिकांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाही होण्याचे आवाहन करण्यात आले असून या आंदोलनाला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने पाठिंबा दिला आहे. तालुका समितीच्या माध्यमातून बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन बेळगाव तालुका म. ए. समितीने केले आहे. बैठकीत माजी आमदार मनोहर किणेकर आर. एम. चौगुले, आर. के. पाटील, लक्ष्मण होनगेकर, राजू किणयेकर, शंकर कोनेरी, रामचंद्र मोदगेकर, चेतन पाटील, मयूर बसरीकट्टी, मल्लाप्पा पाटील, दीपक आंबोळकर, दीपक पावशे आदी उपस्थित होते.