For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उंच मूर्ती, डीजेच्या भिंती अन् अनर्थाची भीती!

11:09 AM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
उंच मूर्ती  डीजेच्या भिंती अन् अनर्थाची भीती
Advertisement

उंच मूर्तींमुळे अडथळ्यांची मालिका, डीजेमुळे अनारोग्याला निमंत्रण, भक्ती-शिस्तीचा अभाव : विसर्जन मिरवणुकीत निर्माण होणाऱ्या धोक्यांची चिंता कोणाला?

Advertisement

बेळगाव : ‘भला, उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसी..?’ काही वर्षांपूर्वी टीव्हीवर ही जाहिरात येत असे. शहरातील गणेशोत्सव मंडळांनी याच धर्तीवर ‘भला, उसकी श्रीमूर्ती मेरे मूर्ती से बडी कैसी?’ अशी चुरस करत जीवघेणी स्पर्धा सुरू केली आहे. मग त्यात कोणाच्या कानाचे पडदे फाटू देत, कोणाला झटका येऊ देत किंवा शॉक लागू देत, आम्हाला पर्वा नाही... ही बेफिकिरी वृत्ती उत्सवाला उन्मादाकडे नेत आहे. विसर्जन मिरवणुकीत डीजे नको, अशा सूचना प्रशासनाने करायच्या आणि मंडळांनी दुर्लक्ष करायचे, हे नेहमीचेच. म्हणजेच ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’ असाच हा प्रकार होत आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत निर्माण होणाऱ्या धोक्याची ना प्रशासनाने गंभीरपणे दखल घेतली ना मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्याचा विचार केला.

...अन्यथा मोठा अनर्थ

Advertisement

हेस्कॉमने गणेशोत्सवापूर्वीच विसर्जन मार्गासह प्रत्येक गणेश मंडळ सार्वजनिक गणेशमूर्ती ने-आण करते, त्या मार्गावरील विद्युतवाहिन्यांची दुरुस्ती केली होती. परंतु, एका मंडळाने विसर्जन मार्गात ऐनवेळी बदल करत एका लहान गल्लीतून डीजे सिस्टीम व गणेशमूर्तीचा ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. कलमठ रोड येथे मध्यरात्री एका उच्च विद्युतभारित तारेचा डीजे सिस्टीमवरील स्क्रीनला स्पर्श झाला आणि त्या क्षणी ती स्क्रीन जळून गेली. सुदैवाने शेजारीच असणाऱ्या ट्रान्स्फॉर्मरमध्ये आरसीसीबी ‘ट्रिप’ झाल्याने धोका टळला. परंतु, जर टीसीवरील आरसीसीबी ट्रिप झाला नसता तर ट्रॉलीतील अनेकांना आपला जीव गमवावा लागला असता. मंडळांनी मूर्ती तर उंच केल्याच, त्याचबरोबर डीजे व त्यावर लावलेल्या स्क्रीनमुळे उंची आणखीन वाढली होती. काही ठिकाणी तर उंच मूर्तींवर येणाऱ्या विद्युतवाहिन्या बाजूला काढून मूर्ती पुढे न्यावी लागली. या सर्व प्रकारांमुळे विसर्जन मिरवणुकीला विलंब होत गेला. एकीकडे प्रशासनाने यावर्षीच्या गणेशोत्सव मिरवणुकीसाठी मोठा बंदोबस्त ठेवला होता. ठिकठिकाणी सीसीटीव्ही तसेच ड्रोन  कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली होती. परंतु, उंच गणेशमूर्तींमुळे वीजपुरवठा बंद करावा लागत होता.यामुळे सीसीटीव्ही कॅमेरेही कुचकामी ठरले.

वीजवाहिन्या हाताने उचलण्याइतपत मजल

विसर्जन मिरवणुकीत तरुणाईचा उन्माद आणखीच वाढला होता. डीजेवर बसून डीजेला लागणाऱ्या वाहिन्या हाताने उचलण्याइतपत त्यांची मजल गेली. काही ठिकाणी वीजवाहिन्या उचलण्यासाठी बांबूचा वापर होत होता. परंतु, चुकून वीजवाहिनी तुटून खाली पडल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. विसर्जन मिरवणुकीत हजारोंची संख्या असल्याने हे किती धोकादायक ठरू शकेल, याची किंचितशीही कल्पना मिरवणुकीतील तरुणाईला नव्हती.

वीजवाहिन्या उंचीवर असूनही अनेक समस्या

गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच अनेक वेळा वीज काढावी लागत होती. हेस्कॉमचे कर्मचारी गणेशभक्तांचा रोष ओढवून घेत होते. परंतु, वीज का काढली जात आहे, याची माहिती मंडळाचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनाच होती. इंडियन इलेक्ट्रिसिटी नियमावलीनुसार रस्त्यापासून 6.5 मीटर उंचीवर विद्युतवाहिन्या असाव्यात. प्रत्यक्षात बेळगावमध्ये 7 ते 8 मीटर उंचीवर वीजवाहिन्या असतानाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

सुरक्षेच्या नावाने बोंब...

गणेशोत्सवाच्या काळात मंडळांना वीजपुरवठ्यासाठी टेम्पररी मीटर दिले जाते. शहरात 380 हून अधिक गणेशोत्सव मंडळे आहेत. यापैकी काही मंडळे मंदिरे तसेच समुदाय भवनात गणेशमूर्ती स्थापन करतात. ही मंडळे वगळता इतर 270 ते 280 मंडळे दरवर्षी वीजपुरवठा घेतात. टेम्पररी मीटर घेतले तरी मंडपामध्ये सुरक्षिततेची इतर कोणतीच पावले उचलली जात नाहीत. कोणताही धोका निर्माण झाल्यास लाईन ‘ट्रिप’ होण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने हे जीवघेणे ठरू शकते. त्यातच संपूर्ण मंडप लोखंडी व त्याला बाहेरून पत्रे लावण्यात आलेले असल्याने यापुढील काळात तरी मंडळांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

मंडळांना भान येणार आहे का?

प्रचंड पाऊस पडला, झाडे उन्मळून पडली की वीजपुरवठा खंडित होतो. आपण लगेच हेस्कॉमच्या नावाने शिमगा करतो व त्वरित वीजपुरवठा सुरू होण्याची अपेक्षा करतो. ज्यांच्या नावे आपण शिमगा करतो, ते हेस्कॉमचे कर्मचारी पाऊस असो, प्रचंड वारे वाहोत, झाडे पडोत, जीवाची बाजी लावून काम करतच असतात. त्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबाचा विचारसुद्धा आपल्या मनात येत नाही. गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून सलग 60 ते 70 तास काम केले नसते तर काही जणांना जीव निश्चित गमवावा लागला असता, याचे भान तरी मंडळांना येणार आहे का?

मंडळांना गांभीर्य नाही

उंच गणेशमूर्ती हा कळीचा मुद्दा ठरत असला तरी 2013 मध्ये सदाशिवनगर येथे उंच गणेशमूर्तीमुळे तब्बल चौघांना जीव गमवावा लागला. या अपघातात जखमी झालेल्या तरुणाला हात गमवावा लागला. या आठवणी ताज्या असतानाही मंडळांकडून गणेशमूर्तींच्या उंचीबाबत गांभीर्याने घेतले जात नाही. तसेच गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा होत असताना सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे, याचा विचार कोणीही करताना दिसत नाही.

मंडळांनी पुनर्विचार करणे गरजेचे

हेस्कॉमने गणेशोत्सवापूर्वी अंदाजे 2 कोटी रुपये खर्च करून नवीन वाहिन्या घातल्या. तरीदेखील काही मंडळांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक उंची वाढवली. काहींनी लहान गल्ल्यांमधून गणेशमूर्ती नेण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारांमुळे हेस्कॉमला वीजपुरवठा बंद करून तर काही ठिकाणी वीजवाहिन्या बाजूला काढून मूर्ती पुढे सरकवाव्या लागल्या. त्यामुळे पुढील वर्षी तरी मूर्तीच्या उंचीबाबत मंडळांनी पुनर्विचार करणे गरजेचे आहे.

-मनोहर सुतार (कार्यकारी अभियंता, हेस्कॉम)

छोट्याशा चुकीमुळे मोठ्या धोक्याची शक्यता

गणेशोत्सवासाठी हेस्कॉमकडून धोकादायक ठिकाणी एरियल बंच केबल घालण्यात आल्या होत्या. तरीदेखील विसर्जन मिरवणुकी दिवशी उंच गणेशमूर्ती, गणेशमूर्तींमागील फुलांची सजावट, डीजेचे रचलेले टॉवर तसेच विसर्जन मार्गात करण्यात आलेला अचानक बदल यामुळे काही ठिकाणी धोका निर्माण झाला होता. रात्रीच्या वेळी कार्यकर्त्यांवर नियंत्रण आणणे शक्य नसते. त्यामुळे एखाद्या छोट्याशा चुकीमुळे मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

-संजीव हम्मण्णावर (साहाय्यक कार्यकारी अभियंता, हेस्कॉम)

Advertisement
Tags :

.