पाकिस्तानशी केवळ पीओकेवर चर्चा
सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा संदेश : दहशतवाद विरोधात व्हावी वैश्विक एकजुटता
वृत्तसंस्था/ क्वालांलपूर
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल ऑपरेशन सिंदूरनंतर जगभरात भारताची बाजू मांडणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने दहशतवाद विरोधात जागतिक एकजुटतेवर जोर दिला. तसेच पाकिस्तानसोबत भविष्यातील चर्चा केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मलेशियात संजद खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचे सदस्य तसेच तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी अनिवासी भारतीयांशी संवाद साधला.
अनेक पक्षांची सरकारं सत्तेवर येऊनही भारत दशकांपासून पाकिस्तानशी चर्चा करत राहिला आहे. परंतु पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया जारी आहेत. याचमुळे आता केवळ पाकव्याप्त काश्मीरसंबंधीच पाकिस्तानसोबत चर्चा केली जाणार असल्याचे अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
भारतासमोर टिकणार नाही पाकिस्तान
पाकिस्तान छुप्या युद्धाद्वारे भारताच्या विकासाच्या यात्रेला रोखण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान भारतासारखी क्षमता प्राप्त करण्याचा विचार स्वप्नातही करू शकत नाही अशा शब्दात टीका शिष्टमंडळाचे सदस्य आणि भाजप खासदार हेमंग जोशी यांनी केली आहे.
दहशतवाद विरोधात जगाने एकजूट व्हावे
दहशतवाद आता सहन केला जाणार नसल्याचे भारत एक सुरात म्हणत आहे. आम्ही जगाला शांततापूर्ण आणि समृद्ध करण्यासाठी दहशतवाद विरोधात सामूहिक आंदोलनाची आशा करतो. आम्ही जो संदेश घेऊन आलो आहोत तो एकतेचा आहे. आम्ही अनेक पक्षांशी संबंधित आहोत आणि भारताच्या अनेक क्षेत्रांमधील आहोत. आम्ही अनेक धर्मांशी संबंधित आहोत, परंतु जेव्हा देश आणि मातृभूमीचा मुद्दा येतो, तेव्हा आम्ही सर्व एकत्र आहोत आणि एका सुरात बोलतो. जेव्हा आमचे सैनिक सीमांचे रक्षण करण्यासाठी जातात, तेव्हा त्यांची भारतमातेचे रक्षण करणे ही एकच भावना असते असे उद्गार काँग्रेस खासदार सलमान खुर्शीद यांनी काढले आहेत.