गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम
अमित पाटकर यांच्यावरच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा विश्वास
पणजी : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वावरच पूर्ण विश्वास ठेवत आगामी निवडणुकांवर लक्ष्य केंद्रीत करण्याच्या सूचना राज्यातील सर्व नेत्यांना दिली आहे. दिल्ली येथे राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा गोव्याचे प्रभारी के. सी. वेणुगोपाल तसेच अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिव तसेच गोव्याच्या सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांच्यासमवेत गोव्यातील काँग्रेस नेत्यांची काल, बुधवारी बैठक झाली. बैठीकीत गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, आमदार कार्लुस फेरेरा, गोवा प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर उपस्थित होते.
प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांनी गोव्यातील प्रत्येक काँग्रेस नेत्यांची स्वतंत्रपणे (वन टू वन) बैठक घेतली. बैठकीत सर्वांचे म्हणणे ऐकूण घेण्यात आले. त्यानंतर गोव्यात होणाऱ्या आगामी जिल्हा पंचायत निवडणुका, पालिका तसेच विधानसभा ह्या सर्व निवडणुका अमित पाटकर यांच्या अध्यक्षतेखालीच लढविल्या जाव्यात, असा निर्णय घेण्यात आला. अमित पाटकर यांनी अध्यक्षपदाची धुरा घेतल्यानंतर सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली गोवा काँग्रेसने राज्यात संघटन मजबूत करण्यावर दिलेला भर तसेच पाटकर यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मिळालेले यश या सर्वांचा सारासार विचार करण्यात आला. सर्व नेत्यांनी एकसंध राहून पक्षाला कोणत्याही परिस्थितीत सत्तेवर आणण्यासाठी एकदिलाने, एकमताने काम करण्याबाबत वेणुगोपाल यांनी सूचना केल्या. बैठकीनंतर गोव्यातील सर्व काँग्रेस नेत्यांनी गोव्याच्या सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांच्यासमवेत भोजन केले.