एस. जयशंकर आणि अँथनी ब्लिंकन यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँथोनी ब्लिंकन यांच्यात दूरध्वनीवरुन महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने ही माहिती दिली आहे. तांबड्या समुद्रातील समुद्री चाचेगिरी, गाझा पट्टीतील युद्ध तसेच युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध या प्रमुख आंतरराष्ट्रीय विषयांवर ही चर्चा झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या तिन्ही विषयांवर भारत आणि अमेरिका यांची चिंता समान आहे. विशेषत: तांबड्या समुद्रात हुती दहशतवाद्यांकडून व्यापारी नौकांवर होणारे हल्ले आणि अशा नौकांची अपहरणे, हा अधिक चिंतेचा विषय आहे. यामुळे युरोप आणि भारताच्या व्यापारामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे अमेरिका, भारत आणि युरोप यांनी संयुक्तरित्या या संकटाचे निवारण करणे आवश्यक आहे. यासंबंधी काही मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी बोलणी केली असे प्रतिपादन चर्चेनंतर करण्यात आले.
दोन्ही देशांमध्ये वाढते सहकार्य
तांबड्या समुद्राचा व्यापारी मार्ग संकटमुक्त ठेवण्यावर ब्लिंकन यांनी भर दिला. या संदर्भात भारत आणि अमेरिका यांच्यात सहकार्य वाढत असल्यासंदर्भात त्यांनी समाधान व्यक्त केले. भारतानेही व्यापारी नौकांच्या संरक्षणासाठी तांबडा समुद्र आणि अरबी समुद्र येथे आपल्या 10 युद्धनौका नियुक्त केलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच भारताने एका लायबेरियन नौकेची समुद्री चाच्यांच्या तावडीतून सुटका केली होती. भारत या संदर्भात अमेरिकेसह अन्य देशांना सहकार्य करीत आहे.
इस्रायल-हमास संघर्ष
इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या तीन महिन्यांपासून अधिक काळ युद्ध होत आहे. हे युद्ध या क्षेत्राबाहेर पसरु नये, तसेच गाझा पट्टीतील नागरीकांना मानवी सहाय्यता पोहचविली जावी, यासंदर्भातही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. भारताने इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्हेशी संपर्क ठेवला असून संघर्ष थांबावा यासाठी प्रयत्न चालविले आहेत, अशी माहिती जयशंकर यांनी चर्चेत दिली.
युक्रेन-रशिया संघर्ष
युव्रेन आणि रशिया यांच्यात गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ युद्ध होत आहे. त्यामुळे जगाच्या पुरवठा साखळ्यांवर परिणाम झाला आहे. अनेक वस्तूंची टंचाई त्यामुळे निर्माण झाली आहे. हे युद्धही शक्य तितक्या लवकर थांबण्याची आवश्यकता असून त्यासंबंधीही दोन्ही नेत्यांनी विचारांची देवाणघेवाण केली.