राज्यात दलित मुख्यमंत्रीबाबत पुढील निवडणुकीनंतर बोलू!
सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात दलित मुख्यमंत्रीबाबत पुढील निवडणुकीनंतर बोलू, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. रविवारी कलबुर्गी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज्यात दलित मुख्यमंत्र्यांची मागणी सध्या थांबली आहे. 2028 च्या निवडणुकीनंतर यावर गंभीर चर्चा करूया. भाजप विधानपरिषद सदस्य एच. विश्वनाथ यांनी पुढील नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री बदलतील, असे केलेल्या विधानाचा आमच्या पक्षाशी काहीही संबंध नाही. ते आमच्या पक्षाचे नाहीत आणि त्यामुळे त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही, असे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
गॅरंटी योजनांमुळे राज्यातील विकास थांबला आहे हा भाजपचा आरोप योग्य नाही. गॅरंटी योजनांमुळे राज्यातील विकास थांबलेला नाही. यापूर्वी बसवराज बोम्माई मुख्यमंत्री असताना त्यांनी काही खात्यांना कोणतेही अनुदान दिले नव्हते. आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर सर्व खात्यांना अनुदान देण्यात आले आहे. राज्यातील कराच्या पैशातून उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यात रस्ते विकास होत आहेत, असा आरोप करत राज्याकडून केंद्राकडे जाणाऱ्या कराच्या पैशापैकी अर्धा भाग केंद्राने आम्हाला द्यावा, अशी मागणीही मंत्री सतीश जारकीहोळी यांनी यावेळी केली.