अफगाणिस्तानातून तालिबानच्या मंत्र्याचे पलायन
तालिबानने दिला होता अटकेचा आदेश : मुलींच्या शिक्षणाचा मुद्दा
वृत्तसंस्था/ काबूल
तालिबानचे उपविदेशमंत्री शेर मोहम्मद अब्बास स्टानिकजई यांना देश सोडावा लागला आहे. स्टानिकजई हे अफगाणिस्तानातून पलायन करत संयुक्त अरब अमिरातमध्ये दाखल झाले आहेत. स्टानिकजई यांनी अफगाणिस्तानात मुलींच्या शिक्षणावर बंदी घालणाऱ्या तालिबानच्या निर्णयावर टीका केली होती. तालिबानने अफगाण मुलींच्या माध्यमिक आणि उच्चशिक्षणातील प्रवेशावर बंदी घातली आहे.
जुन्या काळातही पुरुष आणि महिलांच्या शिक्षणाचे मार्ग खुले होते. जर मी महिलांच्या योगदानाविषयी विस्तृतपणे बोलू लागलो तर मोठा वेळ लागेल असे पाकिस्तान सीमेनजीकच्या खोस्त प्रांतातील एका सोहळ्यात बोलताना स्टानिकजई यांनी म्हटले होते. स्टानिकजई यांच्या या वक्तव्यानंतर तालिबानचा प्रमुख मुल्ला अखुंदजादाने त्यांच्या अटकेचा आदेश दिला होता.
शेर मोहम्मद हा अफगाणिस्तानच्या लोगार प्रांताच्या बराकी बरक जिल्ह्याचा रहिवासी आहे. 1963 मध्ये जन्मलेला शेर मोहम्मद तालिबानी सदस्यांप्रमाणेच पश्तून आहे. राजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर त्याने भारतातील इंडियन मिलिट्री अकॅडमीतून प्रशिक्षण घेतले होते. 1970 च्या दशकापासूनच या अकॅडमीत अफगाण सैनिकांना प्रशिक्षण दिले जात आहे.
भारतात स्वत:चे सैन्य प्रशिक्षण पूर्ण केल्यावर शेर मोहम्मद हा अफगाण सैन्यात दाखल झाला होता. सोव्हियत संघ- अफगाणिस्तान युद्धात तो सामील झाला होता. 1996 मध्ये त्याने अफगाण सैन्याची नोकरी सोडली होती. तोपर्यंत तालिबानची राजवट अफगाणिस्तानात आली होती. शेर मोहम्मद यानंतर तालिबानमध्ये सामील झाला होता.
महिलांच्या नर्सिंगवरही बंदी
तालिबानने मागील महिन्यात महिलांच्या नर्सिंग ट्रेनिंगवरही बंदी घातली आहे. महिला आणि मुली आता नर्सिंगच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकत नसल्याचे तालिबानने म्हटले आहे. तालिबानच्या या निर्णयाचा अफगाणिस्तानवर प्रतिकूल प्रभाव पडणार आहे कारण तो देश यापूर्वीच वैद्यकीय आणि पॅरामेडिकल स्टाफच्या कमतरतेला सामोरा जात आहे.