तालिबानकडून पाकिस्तानी सैन्यावर लेझर शस्त्रांनी हल्ला
पाकिस्तानचे 8 सैनिक ठार झाल्याचा दावा
वृत्तसंस्था/ काबूल
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तोरखम सीमेवर तणाव वाढला आहे. अफगाण तालिबानने सोमवारी रात्री पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कथित स्वरुपात पाकिस्तानचे 8 सैनिक मारले गेले आहेत. तसेच अनेक सैन्य चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. तालिबानच्या या हल्ल्यापूर्वी पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला होता. पाकिस्तानने अलिकडच्या काळात सीमेवरील स्वत:च्या हालचाली वाढविल्या आहेत. यामुळे तालिबान नाराज असल्याने तोरखम सीमेवर युद्धसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तोरखम सीमा मागील 12 दिवसांपासून बंद असून व्यापार थांबला आहे.
अफगाण तालिबानच्या सदस्यांनी सोमवारी रात्री शस्त्रास्त्रांसह पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश केला. त्यांनी लेझर शस्त्रास्त्रांचा वापर करत पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य केले. अफगाण सैन्याला या कारवाईदरम्यान कुठलेच नुकसान झाले नाही. दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याची महत्त्वपूर्ण चौकी तालिबानने नष्ट केली असून 8 सैनिकांनाही ठार केले आहे.
पाकिस्तानचे मौन
या हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानने अद्याप मौन बाळगले आहे. तर या घटनेमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. तोरखम सीमेवर नव्या निर्मितीकार्यावरून पाकिस्तान अन् तालिबान यांच्यात तणाव आहे. रविवारी दोन्ही बाजूने गोळीबार झाला होता, यात अफगाण तालिबानचे तीन सदस्य जखमी झाले होते. तर पाकिस्तानचा एक ट्रकचालक मारला गेला होता.