For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ताळगाव वांगी, हिलारियो आंबा, कोंरगुट, काजू बोंडे, मुसराद आंब्याला ‘जीआय टॅग’

01:31 PM Jan 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
ताळगाव वांगी  हिलारियो आंबा  कोंरगुट  काजू बोंडे  मुसराद आंब्याला ‘जीआय टॅग’
Advertisement

पणजी : राज्यातील विविध वैशिष्ट्यापूर्ण आणि पारंपरिक उत्पादनांना यापूर्वी भौगोलिक निर्देशांक (जीआय टॅग) प्रदान करण्यात आले असून त्या यादीत आता आणखी पाच उत्पादनांची भर पडली आहे. ताळगावची वांगी, हिलारियो आंबा, कोंरगुट तांदूळ, काजू बोंडे आणि मुसराद आंबा यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. जीआय निबंधकांकडून या उत्पादनांना ‘जीआय’ दर्जा देण्यात आला असून त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. अशा प्रकारे मानांकन मिळाल्याने विविध पारंपरिक कृषी उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर नालौकिक प्राप्त होऊन त्यांचे महत्व वाढते. त्याचबरोबर स्थानिक शेती परंपरा, वैशिष्ट्यो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टाला अधिकृत ओळख मिळते.

Advertisement

याच प्रयत्नांतून यापूर्वी खोला मिरची, हरमल मिरची, काजू फेणी, मयंडोळी केळी, वैशिष्ट्यापूर्ण खाजे, मानकुराद आंबा, काजू, आगशीची वांगी, बेबिंका यासारख्या कित्येक उत्पदनांना जीआय मानांकनाने गौरविण्यात आले आहे. या निर्णयामुळे या उत्पादनांचे आंतराष्ट्रीय ब्रँडिंग मजबूत होणार आहे. दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी,  राज्यासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे म्हटले आहे. येथील माती, हवामान आणि परंपरेशी जोडलेल्या उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळणे ही आपल्या कृषी सामर्थ्याची पावती असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत. राज्य सरकारकडून पारंपरिक आणि स्थानिक उत्पादनांचे जतन व मूल्यवर्धन करण्यावर विशेष भर दिला जात आहे. अशावेळी जीआय टॅगमुळे या उत्पादनांची गुणवत्ता व वैशिष्ट्यो कायदेशीररित्या संरक्षित होणार आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा गैरवापर थांबण्यात मदत होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले.

Advertisement
Advertisement
Tags :

.