परमार्थाच्या प्राप्तीकरिता सद्गुरूंचा आश्रय हा मूलाधार असतो
अध्याय चौथा
भगवंत अर्जुनाला म्हणाले, श्रद्धावान, इंद्रिय जिंकलेल्या, ज्ञानसाधनेत तत्पर असलेल्या पुरुषाला ज्ञान प्राप्त होते. त्या ज्ञानाने त्याला भगवतप्राप्तीच्या रूपाने परमशांती लाभते. ह्या अर्थाचा
श्रद्धेने मेळवी ज्ञान संयमी नित्य सावध । ज्ञानाने शीघ्र तो पावे शांति शेवटची मग ।। 39 ।।
हा श्लोक आपण पहात आहोत. आत्मज्ञान मिळवण्यासाठी माणसाची सद्गुरूंच्या वचनावर नितांत श्रद्धा असणे आवश्यक आहे. त्याची श्रद्धा जेव्हढी घनिष्ट असेल तेव्हढ्या प्रमाणात त्याच्या हातून त्यांच्या उपदेशाचे पालन होऊ शकेल. परमार्थाच्या प्राप्तीकरिता सद्गुरूंचा आश्रय हा मूलाधार असतो. त्यांच्या कृपेने इच्छा मावळल्या, वैयक्तिक सुखाची कल्पना नाहीशी झाली म्हणजे परमात्म्याचा मंगलरूप अनंत आनंद हृदयात स्फुरू लागतो. त्याची एकनिष्ठ भक्ती पाहून सद्गुरू त्याला आशीर्वाद देतात आणि त्याचे फळ म्हणून त्याच्यात आधीपासून असलेले आत्मज्ञान प्रकट होते. आत्मसुखाबद्दल काय सांगावं, एकदा का साधकाला त्याची अमृतमधुर गोडी लागली, की मन ज्ञानेंद्रियांनी दाखवलेल्या विषयसुखाच्या आकर्षणाला विटून जाते. साधक आपल्याकडे लक्ष देत नाही म्हंटल्यावर ज्ञानेंद्रिये निष्प्रभ होतात. मन विषयांच्या उपभोगाची इच्छा करत नसल्याने मनात त्यांचे विचारसुद्धा येत नाहीत. त्यामुळे इंद्रियांना माणसाच्या मनात उमटलेल्या सुखाच्या उपभोगाची आकर्षणे दाखवायचे कामच उरत नसल्याने ती निक्रिय होतात.
ह्याचे एक व्यवहारातील उदाहरण पाहू. समजा तुम्ही घरातील लहान मुलांना घेऊन यात्रेला गेलेला आहात. यात्रेला जाण्याचा तुमचा मुख्य उद्देश ज्या देवाची यात्रा असेल त्याचे दर्शन घेणे हा असतो तर बरोबर आलेल्या लहान मुलांना देवदर्शनापेक्षा तेथील खाऊ, पाळणे, खेळणी ह्यांचे बालसुलभ आकर्षण असते. अर्थात तुमच्या मनात देवदर्शनाचे विचार मुख्य असतात आणि खाऊ खेळण्यांबद्दल तुमचे आकर्षण संपलेले असल्याने त्याबद्दलचे विचार तुमच्या मनाला शिवतसुद्धा नाहीत. हाच फरक सामान्य मनुष्य आणि आत्मज्ञानी योगी, भक्त ह्यांच्या मन:स्थितीत असतो.
सामान्य मनुष्याला आत्मस्वरूपाचे भान नसल्याने रोजच्या जीवनातील सुखोपभोग त्याला वेड लावतात. तो सतत त्यांचा विचार करत असल्याने त्याची ज्ञानेंद्रिये त्याने विषयांचा अधिकाधिक उपभोग घ्यावा म्हणून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्यासंबंधित शक्य असतील ती सर्व आकर्षणे त्याला दाखवतात. विषयांचा उपभोग घेण्याकडे खेचत असतात. ह्याउलट आत्मज्ञानी व्यक्तीला त्यांचे काहीच आकर्षण वाटत नसल्याने त्यांची ज्ञानेंद्रिये निक्रिय झालेली असतात. आत्मज्ञानी मनुष्य आत्मस्वरूपाचे भान ठेऊन असल्याने स्वत:ला कर्ता समजत नाही. त्यामुळे इंद्रियांनी जर विषयांचे आकर्षण दाखवले तर आता मी ह्या विषयांचा उपभोग घेऊ शकतो असा अहंकारी विचार त्याच्या मनात येत नाही. त्यामुळे तो सुखी झालेला असतो. ज्या ज्ञानात अखंड शांती असते, ते ज्ञान त्याला शोधत येते. ते हृदयात स्थिर झाले की, त्यापासून शांतीचा अंकुर उमलू लागतो. मग आत्मज्ञानाची वेल मोठ्या प्रमाणात प्रगट होऊ लागते. जिकडे पाहावे तिकडे परमशांतीच दिसू लागते, आप-पर भाव संपून जातो.
क्रमश: