For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचे अधिकारग्रहण

10:21 AM Feb 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचे अधिकारग्रहण
Advertisement

बेळगाव : येथील डॉ. सोनाली सरनोबत संचालित जिजाऊ ब्रिगेड (राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठान) च्या पदाधिकाऱ्यांचा अधिकारग्रहण समारंभ तुकाराम महाराज हॉल, इंद्रप्रस्थनगर येथे नुकताच पार पडला. प्रमुख वक्त्या म्हणून सुनीता पाटणकर व डॉ. मनीषा नेसरकर उपस्थित होत्या. प्रारंभी गीता लोहार यांनी स्वागतगीत सादर केले. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. डॉ. सोनाली सरनोबत यांचा परिचय किशोर काकडे यांनी करून दिला. डॉ. सोनाली यांनी स्वागतपर भाषणात प्रतिष्ठानचा हेतू आणि उद्देश स्पष्ट केला. त्या म्हणाल्या, 2000 साली आपण राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानची नोंदणी केली. परंतु, त्याला मूर्तस्वरुप आज प्राप्त झाले आहे. हे राजकीय व्यासपीठ नसून समाजकल्याण व संस्कृती संवर्धन हाच आपला हेतू आहे. लवकरच प्रत्येक जिल्ह्यात व राज्यात अशा शाखा सुरू करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना सुनीता पाटणकर यांनी राजमाता जिजाऊ यांच्याकडून आपण प्रेरणा घ्यायला हवी. स्वराज्य हे एकच स्वप्न त्यांनी पाहिले आणि ते साकारण्यासाठी डोळ्यात तेल घालून शिवबाला घडविले. राजकारणाचा त्यांचा सखोल अभ्यास होता.

Advertisement

त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांची प्रत्येक मोहीम यशस्वी झाली. कार्यकर्ता कसा निर्माण करावा आणि कामकाजाचे व्यवस्थापन कसे असावे? हे आपण त्यांच्याकडून शिकायला हवे, असे सांगितले. मनीषा नेसरकर यांनी भौतिक विकास खूप झाला तरी सांस्कृतिक विकास अजून व्हायला हवा. व्यक्तीस्वातंत्र्याच्या कल्पनेमुळे कुटुंबे दुभंगत चालली आहेत आणि सांस्कृतिक अधोगती सुरू आहे. अशावेळी प्रत्येक आईने राजमाता जिजाऊ यांच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि आपली मुले सुजाण नागरिक कशी होतील? यावर भर द्यावा, असे सांगितले. यानंतर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष नम्रता हुंदरे, कांचन चौगुले, गीता चौगुले, आशाराणी निंबाळकर, नीना काकतकर, सचिव मंगल पाटील, लक्ष्मी गौंडाडकर, चंद्रा चोपडे, निशिता कदम, उपाध्यक्षा दीपाली मलकारी, स्वाती फडके, वृषाली मोरे यांना अधिकार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचलन डॉ. सोनाली सरनोबत यांनी केले. कांचन चौगुले यांचा परिचय सुनीता पाटणकर यांनी तर मनीषा नेसरकर यांचा परिचय दीपाली मलकारी यांनी करून दिला. नूतन कार्यकारिणीतर्फे गीता चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन किशोर काकडे यांनी केले. नम्रता हुंदरे यांनी आभार मानले. यानंतर सर्वांना वाण देण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.