For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर हायटेक बसस्थानकाच्या बाजूने रस्ता करा

10:26 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूर हायटेक बसस्थानकाच्या बाजूने रस्ता करा
Advertisement

आमदार विठ्ठल हलगेकर यांनी प्रयत्न करणे गरजेचे : बसस्थानकाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू : आंबेडकर उद्यानालाही लागून रस्ता होणे आवश्यक

Advertisement

खानापूर : खानापूर हायटेक बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बसस्थानकाचे अंतर्गत काम युद्धपातळीवर सुरू आहे. बसस्थानकाच्या बाजूने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाला लागून रस्ता करण्यात यावा, अशी शहरासह तालुक्यातील जनतेची मागणी होत आहे. याबाबत अनेकवेळा मागणी करून देखील आमदार विठ्ठल हलगेकर यांनी कोणतेच प्रयत्न केले नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. हा रस्ता तातडीने करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. आमदार अशोक पाटील यांच्या कार्यकाळात पंचवीस वर्षांपूर्वी हे बसस्थानक निर्माण करण्यात आले होते. त्यावेळी गायरान कमिटीची जागा नगरपंचायतीच्या माध्यमातून केएसआरटीसीला हस्तांतर करण्यात आली होती. यावेळी बसस्थानक निर्माण करताना बसस्थानकाला लागून असलेल्या आंबेडकर उद्यानातून एक रस्ता सोडण्यात यावा, असे नियोजन करण्यात आले होते. मात्र त्यावेळच्या स्थानिक राजकारणाच्या स्वार्थी आणि आडमुठ्या धोरणामुळे हा रस्ता करण्यात आलेला नव्हता. मात्र पारिश्वाड रस्त्यावरून बसस्थानकाच्या मागून लक्ष्मीनगरला रस्ता जोडण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना 1 कि. मी.चा फेरा मारुन जावे लागत आहे.

माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या प्रयत्नातून खानापूर शहराला हायटेक बसस्थानक मंजूर करण्यात आले. यासाठी कोट्यावधीचा निधी मंजूर झाला आणि हायटेक बसस्थानक निर्मितीचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. आता बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जर बसस्थानकाच्या आणि आंबेडकर गार्डनला लागून रस्ता निर्माण झाल्यास नागरिकांची चांगली सोय होणार आहे. हा रस्ता करण्यात यावा, अशी मागणी सर्व नागरिकांतून होत आहे. मात्र आमदार विठ्ठल हलगेकर यांनी याबाबत कोणतीच बैठक अथवा शासकीय पातळीवर प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे बसस्थानक एकदा पूर्ण झाल्यास रस्ता होणार नसल्याने खानापूरच्या भविष्याच्या विकासाच्या दृष्टिकोन गरजेचे आहे. त्यामुळे खानापूर शहरासाठी हा रस्ता अत्यंत गरजेचा आणि उपयुक्त होणार आहे. त्यासाठी अद्यापही आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शासकीय पातळीवर तसेच केएसआरटीसी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा रस्ता करून घेण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.