लोकांच्या आरोग्य तपासणीसाठी घ्यावा पुढाकार
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे लोकसभेत खासदारांना आवाहन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्व खासदारांनी स्वत:च्या मतदारसंघात राहत असलेल्या सर्व नागरिकांची दरवर्षी आरोग्य तपासणी सुनिश्चित करावी असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी शुक्रवारी लोकसभेत केले आहे. सरकारने आयुष्मान आरोग्य मंदिराच्या अंतर्गत 30 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करविण्याचे अभियान सुरु केले आहे. या मोफत तपासणीदरम्यान रक्तदाब, मधूमेह आणि कॅन्सर यासारख्या आजारांची तपासणी केली जाणार असल्याचे नड्डा यांनी सांगितले आहे.
या अभियानात आतापर्यंत 35 कोटी लोकांची तपासणी झाली आहे. यातील 4.5 कोटी लोक हायपरटेंन्शनने पीडित असल्याचे आढळून आले. तर 2.6 कोटी लोकांमध्ये मधुमेहाची लक्षणे दिसून आली. 29 कोटी लोकांची कॅन्सरसंबंधी तपासणी करण्यात आली आणि यातील 1.18 कोटी लोकांना कॅन्सर असल्याचे निदान झाले. याचमुळे स्वत:च्या मतदारसंघात दरवर्षी नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन करावे असे आवाहन खासदारांना करत असल्याचे नड्डा यांनी म्हटले आहे.
प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सर डे केयर सेंटर
देशात सध्या 372 कॅन्सर डे केयर सेंटर आहेत, 19 राज्य कॅन्सर सेंटर आणि 22 क्षेत्रीय कॅन्सर सेंटर संचालित होत आहेत. सर्व एम्समध्ये कॅन्सर केयर सेंटर असून तेथे सर्व आधुनिक तपासणी उपकरणे आहेत. हरियाणाच्या झज्जर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे जगातील सर्वात चांगल्या कॅन्सर हॉस्पिटल्सपैकी एक आहे. तर अर्थसंकल्पातील घोषणेनुसार सरकार प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सर डे केयर सेंटर निर्माण करणार असून तेथे किमोथेरपीची सुविधा देखील मिळणार असल्याचे न•ा यांनी सांगितले आहे.