For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

11:25 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
Advertisement

आयएमएच्या पुढाकाराने शहरातील डॉक्टरांचा मूकमोर्चा : पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : रुग्णांवर उपचार करून त्यांना आरोग्य देणाऱ्या डॉक्टरांवरच हल्ले करून त्यांचे स्वास्थ्य बिघडविण्याचे कृत्य अत्यंत निषेधार्ह आहे. 14 फेब्रुवारी रोजी केएलईचे रेडिओलॉजिस्ट डॉ. प्रदीप गौडर यांच्यावर पार्किंगसारख्या क्षुल्लक कारणावरून हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व डॉक्टरांना दिलासा द्यावा, अशी मागणी करत आयएमएच्या पुढाकाराने शहरातील डॉक्टरांनी मूकमोर्चा काढून पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, केएलई हॉस्पिटलचे डॉ. प्रदीप गौडर यांच्याशी वाद करून दोघा जणांनी सदाशिवनगर येथे डॉक्टरांच्या कुटुंबीयांसमोरच त्यांना मारहाण केली. डॉक्टरी पेशा हा पवित्र पेशा मानला जातो. डॉक्टरांना मारहाण करण्यापर्यंत जर एखाद्याची मजल जात असेल तर ती चिंताजनक बाब आहे. या प्रकारामुळे डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. हे सर्व लक्षात घेऊन आयएमएच्या पुढाकाराने शहरातील डॉक्टरांनी आयएमएपासून धर्मवीर संभाजी चौक ते परत पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत मूकमोर्चा काढून पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांना निवेदन दिले.

यावेळी बोलताना आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनगोळ म्हणाले, कोणावरही हल्ला होणे हे समर्थनीय नाही. डॉक्टरांवर हल्ला होणे हे तर निषेधार्ह आहे, तितकेच चिंताजनक आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी त्वरित लक्ष घालावे व हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच लवकरात लवकर चार्जशिट दाखल करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी उपस्थित अन्य डॉक्टरांनीसुद्धा याच मागणीचा पुनरुच्चार केला. असे हल्ले वाढत राहिल्यास डॉक्टरांना काम करणे कठीण होईल, असे मत यावेळी अनेक डॉक्टरांनी व्यक्त केले. तक्रार दाखल करण्यास गेल्यावरही पोलीस गांभीर्याने दखल घेत नाहीत, याकडे पी. व्ही. स्नेहा यांचे लक्ष वेधण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून अशी कोणतीही घटना घडल्यास आपण त्वरित आपल्याशी संपर्क साधा. शिवाय 112 क्रमांकावर तक्रार नोंदवा. याप्रकरणी आपण लक्ष घालू आणि पुन्हा असे प्रकार होणार नाहीत, यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही पी. व्ही. स्नेहा यांनी दिली.

Advertisement

‘स्टॉप व्हायोलन्स’...

या मूक मोर्चामध्ये डॉक्टरांनी विविध फलक हातात धरले होते. ‘डॉक्टर म्हणजे ‘सॉफ्ट टार्गेट’ समजू नका, आम्हालाही प्रत्युत्तर देता येते’ (वुई फाईट बॅक), ‘आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर हल्ले नकोत’, ‘वुई प्लेज झिरो टॉलरन्स टू हेल्थकेअर’, ‘कॉमन मॅन ईन डेंजर’, ‘स्टॉप व्हायोलन्स’ असा मजकूर या फलकांवर लिहिण्यात आला होता.

जर काहीच कारवाई झाली नाही तर पुढील दिशा ठरवू

यावेळी ‘तरुण भारत’शी बोलताना डॉ. अनगोळ म्हणाले, असे हल्ले अलीकडच्या काळात सातत्याने होत आहेत. या प्रकारामुळे केवळ डॉक्टरच नव्हे तर त्यांचे कुटुंबीयसुद्धा भीतीच्या छायेखाली आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टरांना सेवा बजावणे कठीण होणार आहे. आयएमएतर्फे आम्ही निवेदन दिले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला कारवाईचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आम्ही वाट पाहू व जर काहीच कारवाई झाली नाही तर पुढील दिशा ठरवू.

-डॉ. आर. बी. अनगोळ (आयएमए अध्यक्ष)

डॉक्टरांवर हल्ला होणे एक प्रकारची गुंडगिरीच

डॉक्टरांवर हल्ला होणे हा भ्याडपणा आणि एक प्रकारची गुंडगिरीच आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही तर गुन्हेगारांना खतपाणीच मिळेल व चुकीचा संदेश समाजात जाईल. कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही स्वरुपाचा हल्ला होणे हे निषिद्धच आहे. आज डॉक्टरवर हल्ला होत आहे, उद्या सामान्य माणसावरही होऊ शकतो. त्यामुळे कारवाईची मागणी आम्ही करत आहोत. पोलिसांनी त्वरित एफआयआर दाखल केल्यास लवकर न्यायसुद्धा मिळू शकेल. समाजातील प्रत्येक घटकाचे म्हणणे ऐकून घेणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. समाज मौन धारण करतो, त्यामुळे हिंसा वाढत आहे. जे अत्यंत चुकीचे आहे.

-डॉ.राजेश लाटकर (भूलतज्ञ व आयएमएचे माजी अध्यक्ष)

कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य

जर डॉक्टरांवर हल्ले होत असतील आणि पोलीस त्याची वेळीच दखल घेत नसतील तर सामान्यांना कशी वागणूक मिळत असेल? याची कल्पना आपण करू शकतो. न्याय सर्वांसाठी समानच आहे. त्यामुळे ज्यांनी हे हल्ले केले, त्यांच्यावर कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे आणि आम्ही ती अपेक्षा करणे गैर नाही.

-डॉ.संजय पोरवाल

कोणीही कायदा आपल्या हातात घेण्याचे कारण नाही

सातत्याने डॉक्टरांना लक्ष्य केले जात आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. सदर प्रकरणी लवकर एफआयआर दाखल व्हायला हवा. कोणत्याही तक्रारीसाठी पोलीस आणि कायदा आहे. त्यामुळे कोणीही कायदा आपल्या हातात घेण्याचे कारण नाही.

-डॉ. व्ही. बी. यलबुर्गी

Advertisement
Tags :

.