स्पर्धेच्या युगात जीवनाचा ताळेबंद साधा ! डॉ. चेतन नरके यांचा सल्ला
कोल्हापूर प्रतिनिधी
विद्याथ्यांनी स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी कष्ट, मेहनत, चिकाटी व आत्मविश्वासादवारे संघर्ष करत स्वत:चे करिअर यशस्वी करावे, स्पर्धेच्या, जागतिकीकरणाच्या युगात जीवनाचा ताळेबंद साधला पाहिजे, नेहमी नवनवीन गोष्टीचा अभ्यास करुन त्या शिकण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळेल, असे प्रतिपादन थायलंड सरकारचे वाणिज्य विषयक सल्लागार, गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी केले.
गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात आयोजित ‘करिअर अपॉरच्युनिटी व चॅलेंजीस’ (करिअरच्या संधी आणि आव्हाने) या विषयावरील व्याख्यानात डॉ. नरके यांनी मार्गदर्शन करताना उपस्थित विद्यार्थ्यांना टिप्स्ही दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर बी भुयेकर होते.
डॉ. नरके म्हणाले, करिअर घडविण्यासाठी विविध गोष्टींचा अंगिकार करणे महत्वाचे ठरते. नेहमी प्रवास करा, नवनवीन माहिती, ठिकाणे, तेथील लोक, संस्कृती, उद्योगशीलता यांचा अभ्यास करा, त्यातून पूरक कौशल्ये प्राप्त करा. आयुष्यात कोणतेही काम करताना कमीपणा बाळगू नका, झोकून देऊन काम केल्यास जीवनात यशस्वी करिअर करता येईल. स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. मंजिरी मोरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. डो पी. डी आवटे यांनी करुन दिला. रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी मोरे यांच्या हस्ते ग्रंथ व गुलाबपुष्प देऊन डॉ. चेतन नरके यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल सदस्य दौलत देसाई, अरुण नरके फौंडेशनचे पदाधिकारी यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.
यावेळी उपप्राचार्य एन. टी. पाटील, पर्यवेक्षक एस. एन. मोरे, प्रा. एस. आर. घाटगे यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. रुबीना मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रा. एस. आर. घाटगे यांनी मानले.
प्रेरणादायी अर्थात मोटिव्हेशनल स्पीच
इंटरनॅशनल इकॉनॉमी, कॉमर्स, इंडस्ट्रिज या विषयातील तज्ञ असणाऱ्या डॉ. चेतन नरके यांचे दूग्ध व्यवसायासह इतर पूरक व्यवसायासंदर्भात अभ्यास आहे. थायलंड सरकारचे वाणिज्य विषयक सल्लगार म्हणून ते कार्यरत आहेत. गोकुळ दूध संघावर संचालक झाल्यापासून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विकास आणि हिताचे धोरणावर त्यांचा अभ्यास सुरू आहे. गोखले महाविद्यालयातील आपल्या व्याख्यानात त्यांनी मोटिव्हेशनल स्पीच देत उपस्थित विद्यार्थ्यांना टिप्स् दिल्या. त्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. विद्यार्थ्यांनी त्यांच्याबरोबर सेल्फी काढत आदर व्यक्त केला.
डॉ. चेतन नरके यांनी दिलेल्या टिप्स्
-करिअरमध्ये डेडीकेशन, पर्सिस्टन्स आणि पॅशन या तीन गोष्टी महत्वाच्या.
-जॉबची किंवा स्वयंरोजगाराची संधी शोधत असताना स्वभाव कल चाचणीच्या माध्यमातून स्वत:चे क्षेत्र निवडा.
-फक्त जॉब घेणारे न होता जॉब देणारे होण्याचाही विचार करा.
-अनेक सबसिडीज आहेत. भविष्यातील ट्रेण्ड ओळखून व्यवसायाची निवड करा.
- अभ्यास करायच्या वयात अमिषाला बळी न पडता ध्येयावर लक्ष केंद्रित करून मेहनत घ्या.