For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाण्यासाठी खबरदारी उपाययोजना करा!

11:18 AM Apr 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाण्यासाठी खबरदारी उपाययोजना करा
Advertisement

सिद्धरामय्या यांचे जिल्हा प्रशासनांना निर्देश : पेयजलाच्या समस्येबाबत घेतला आढावा

Advertisement

बेंगळूर : राज्यातील पाच जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांत पावसाची कमतरता दिसून येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार नाही, यासाठी खबरदारी उपाययोजना कराव्यात, अशी सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. राज्यात पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांनी तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.  ग्रामीण व शहरी भागातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याबाबत मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी विधानसौधमध्ये जिल्हा पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी यांची बैठक घेतली. केंद्रीय हवामान विभागाने यावर्षी नैर्त्रुत्य मान्सून कालावधीत नेहमीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. ऑगस्ट महिन्यात साधारण पावसाचे अनुमान असून सप्टेंबर महिन्यात कमी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याबाबत महसूल खाते, पंचायतराज विभाग व नगरविकास खात्याने एकमेकांशी समन्वयाने काम करावे. एप्रिल ते जून या कालावधीत उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांत नेहमीपेक्षा अधिक तापमान असू शकेल. त्यामुळे जिल्हा प्रशासनांनी अधिक सतर्कतेने काम केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

पिण्याच्या पाण्यासाठी निधीची कमतरता नाही

Advertisement

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी अनुदानाची कमतरता नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश अर्थखात्याला दिले आहेत, असे  मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

27 शहरांत पेयजलाची समस्या

राज्यातील 27 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पेयजलाची समस्या आहे. 57 टँकरद्वारे एकूण 145 वॉर्डांना पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच 22 कूपनलिका भाडोत्री तत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. अनिवार्य परिस्थितीतच टँकरने पाणीपुरवठा करावा. खासगी कूपनलिका भाडोत्री घेण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले. जुलैच्या मध्यापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी जलाशयांमधील पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी. शेतीपेक्षा पिण्याच्या पाणीपुरवठ्याला प्राधान्य द्यावे. जलाशयांमधील पाण्याची गळती रोखण्यासाठी तातडीने दुरुस्तीकामे हाती घ्यावीत. पिण्याच्या पाण्याबाबत जनतेच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद द्यावा. याकरिता तालुका आणि वॉर्ड स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करावेत. जिल्हा स्तरावर कृतीदलाने सक्रियपणे काम करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

आर. ओ. प्लांट 24 तास सुरू ठेवा

आर. ओ. वॉटर प्लांट (शुद्ध पेयजल केंद्रे) 24 तास सुरू राहतील याची खातरजमा करावी. या प्लांटना नियमित वीजपुरवठा करावा. दुरुस्तीकामे आवश्यक असतील तर ती त्वरित करावीत. पिण्याच्या पाणीपुरवठ्यातील समस्या सोडविण्यासाठी तालुका स्तरावर पथके नियुक्त करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.

598 ग्राम पंचायतींमध्ये पाणीटंचाई

राज्यात उन्हाळा कालावधीत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असणारे 213 तालुके आणि 2,410 ग्राम पंचायती निश्चित करण्यात आल्या आहेत. सध्या 114 तालुक्यांमधील 598 ग्राम पंचायतींमध्ये पाणीटंचाई आहे. एकूण 129 टँकरद्वारे 137 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तर 585 खासगी कूपनलिका भाडोत्री घेऊन त्याद्वारे 515 गावांना पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

Advertisement
Tags :

.