जनतेचा कल लक्षात घ्या
सध्या राजधानी दिल्लीत आंदोलनांची धामधूम उडाली आहे. आज शनिवारी कॉक्रोच जनता पार्टीने पुन्हा दिल्ली गाठण्याची योजना आखली आहे. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी या आंदोलनात उतरण्याचा निर्धार केला असून कुटुंबासह ते यात उतरणार आहेत. कॉक्रोच जनता पार्टी हे केजरीवाल यांचेच ‘ब्रेन चाईल्ड’ आहे, असा आरोप केला जातोच. आता हे ‘पितृत्व’ त्यांनी उघडपणे स्वीकारायचे ठरविलेले दिसते. दिल्ली पोलिसांनीही आंदोलकांचे ‘स्वागत’ करण्यासाठी सज्जता केलेली दिसून येते. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनीही गेले चार दिवस दिल्ली दणाणून सोडण्याचा शक्य तितका प्रयत्न केला. या गदारोळात प्रसार माध्यमे बुडालेली असताना, भारतातल्या विविध भागांमधील मतदारांनी आपला कल आणि कौल काही पोटनिवडणुकांच्या माध्यमातून समोर ठेवला आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमध्ये या पोटनिवडणुकांसाठी 6 ऑक्टोबरला मतदान झालेले होते. मतमोजणी शुक्रवारी पार पडली. पश्चिम बंगालमधील दोन्ही विधानसभा पोटनिवडणुका भारतीय जनता पक्षाने दणदणीत जिंकल्या. पुद्दुचेरीतही एका पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटकपक्षाचा मोठा विजय झाला. आसाममध्ये नागांव मतदारसंघात लोकसभेसाठी पोटनिवडणूक होती. तेथेही भारतीय जनता पक्षाचा उमेदवार शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा दीड लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर होता. तामिळनाडूत विधानसभेच्या दोन्ही पोटनिवडणुका नुकत्याच सत्तेवर आलेल्या टीव्हीके या पक्षाने जिंकल्या. नागांव लोकसभा मतदारसंघात जर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी झाला, तर या पक्षाची लोकसभेत एक जागा वाढणार आहे. तेथे हा मजकूर लिहिपर्यंत अंतिम परिणाम घोषित न झाल्याने त्या जागेसंबंधी टिप्पणी करता येत नसली, तरी एकंदरीत जनतेने या आंदोलनांमध्ये जे विषय हाताळण्यात येत आहेत, ते आपल्यासाठी महत्त्वाचे नसल्याचे निश्चितपणे आणि स्पष्टपणे सूचित केले आहे. यावरुन उठसूट रस्त्यावर उतरुन लोकशाहीच्या नावाने धुडगुस घालणारे राजकीय पक्ष आणि संघटना यांनी काही बोध घेतल्यास ते त्यांच्याच दृष्टीने चांगले होईल. पण जनतेला काय हवे आहे (आणि त्याहीपेक्षा काय नको आहे) याचे तारतम्य हे पक्ष आणि संघटना बाळगतील काय याविषयी शंका आहे. पोकळ, बिनबुडाच्या आणि पुरावाहीन आरोपांच्या आधारावर आंदोलने करुन शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर जनता अशा आंदोलकांच्या पाठीशी उभी रहात नाही, हे या पोटनिवडणुकांच्या परिणामांवरुन दिसून येते. विशेषत: या पोटनिवडणुकांमधील दोन विशेष महत्त्वाच्या आणि संबंधितांनी धडा घ्यावा, अशा आहेत. पश्चिम बंगालमधील रेजीनगर हा मुस्लीमांची लक्षणीय संख्या असणारा मतदारसंघ आहे. तेथे हुमायून कबीर या त्या भागात नाव असलेल्या नेत्याच्या मुलाने निवडणूक लढविली होती. पण या मतदारसंघातही भारतीय जनता पक्षाच्या हिंदू उमेदवाराने मोठ्या मताधिक्क्याने यश मिळविले. असेच आसामच्या नागांव मतदारसंघातही घडत आहे. पण शुक्रवारी संध्याकाळपर्यंत अंतिम परिणाम घोषित न झाल्याने तो बाजूला ठेवला, तरी एकंदर जनतेच्या मनात काय आहे आणि तिला काय हवे आहे, हे राजकीय पक्षांनी लक्षात घ्यावे, हे स्पष्ट करणारे हे परिणाम आहेत. लोकशाहीत सत्ताधाऱ्यांना विरोध करणे, कोंडीत पकडणे, आंदोलने करणे या साऱ्या कृतींचे महत्त्व आहे. विरोधकांकडून या कृतींची अपेक्षाही केली जाते. तथापि, विरोध प्रकट करताना किमान साधनशुचिता पाळणे आवश्यक असते. प्रक्षोभक भाषेचा उपयोग, अश्लील आणि अश्लाघ्य घोषणा, उच्चपदस्थांविषयी व्यक्तिगत अपमानास्पद शब्दप्रयोग, पोलिसांवर दगडफेक, त्यांच्याशी धक्काबुक्की आणि तत्सम काही केल्याने काही काळापुरता आनंद मिळाला तरी, त्यातून कोणत्याही समस्या सुटत नाहीत. तसेच समाजही अशा कृतींना समर्थन देत नाही. गेल्या दोन महिन्यांमध्ये देशाने अनेक आंदोलने अनुभवली. पण त्यांचा जनमानसावर कोणताही परिणाम झाल्याचे किंवा या आंदोलनांना लोकांनी समर्थन दिल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आता निदान जे जबाबदार आणि जुने-जाणते विरोधी पक्ष आहेत, त्यांनी तरी अशा प्रकारे वागून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरु नये. असे केल्याने मते मिळत नाहीत. केवळ याच पोटनिवडणुका नव्हेत, तर अनेक विद्यापीठांच्या विद्यार्थी मंडळांच्या निवडणुकाही याच दोन महिन्यांमध्ये झाल्या. ज्या सत्ताधाऱ्यांविरोधात ही आंदोलने करण्यात आली, त्याच सत्ताधाऱ्यांशी संबंधित संघटनेने अनेक स्थानी मोठा विजय मिळविला. काही ठिकाणी तर आजवर कधीच यश मिळाले नव्हते, तेथेही या संघटनेने यश संपादन केले. तेव्हा ‘जेन-झेड’ किंवा तरुणाई आंदोलनाच्या नावाने केलेल्या धांगडधिंग्याने प्रभावित होत नाही. या तरुणाईला प्रयत्नपूर्वक देश बलशाली करायचा आहे, हे जाणणे आवश्यक आहे.