अपघात नियंत्रणासाठी धोकादायक ठिकाणी उपाययोजना करा
जिल्हाधिकाऱ्यांची पोलीस प्रशासनाला सूचना : इतर खात्यांच्या अधिकाऱ्यांचीही उपस्थिती
बेळगाव : बेळगाव शहर व जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने अपघात घडणारी धोकादायक ठिकाणे शोधून अशा ठिकाणी अपघात नियंत्रणासाठी आवश्यक उपक्रम हाती घेण्याची सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अधिकाऱ्यांना केली. गुरुवार दि. 22 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा पातळीवरील रस्ते सुरक्षितता समितीच्या अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी ही सूचना केली आहे. या बैठकीत पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख श्रुती, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंते एस. बी. सोबरद, जिल्हा आरोग्य व कुटुंबकल्याण अधिकारी डॉ. महेश कोनी, प्रादेशिक परिवहन विविध खात्यांचे अधिकारी सहभागी झाले होते.
देशभरात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय सतत या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांनी रस्ते सुरक्षितता समितीच्या बैठकांना हजर होणे सक्तीचे आहे. याबरोबरच आपल्यावरील जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, अशा सूचना करीत यमनापूर, गोगटे सर्कल व कॉलेज रोडवर अपघात वाढले आहेत. या परिसरात अपघात घटवण्यासाठी सुरक्षित उपाययोजना राबवाव्यात, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या तीन वर्षात झालेले अपघात, अपघातातील मृतांची संख्या व ब्लॅक स्पॉटचे अहवाल देण्याच्या सूचना करून आतापर्यंत पाहणी करण्यात आलेल्या धोकादायक ठिकाणी अपघात घटवण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवाव्यात याविषयी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. रस्त्यावरील ख•s त्वरित बुजवावेत. संबंधित शासकीय खात्यांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले. राज्य महामार्गावर सातत्याने पोलिसांची गस्त ठेवावी. एखादा अपघात घडल्यानंतर त्वरित आरोग्य सेवा पुरविण्यासाठी रुग्णवाहिका व जवळच्या इस्पितळांची यादी तयार करावी, असेही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. यावेळी बोलताना पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी मॉडिफाय केलेल्या वाहनावर कारवाईची सूचना केली. शाळा-कॉलेजजवळ झेब्रा क्रॉसिंग घालावे, बेळगाव शहर व कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पावले उचलावीत, असे सांगितले.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले, चालू महिन्यात अपघातांची संख्या वाढली आहे. पावसामुळे रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे अपघात वाढले आहेत. संबंधित खात्यांनी या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. वाढते अपघात घटवण्यासाठी खबरदारी घ्यावी. महामार्ग किंवा जिल्हा मुख्य रस्त्यावर मिळणाऱ्या रस्त्यावर प्रकाशाची व्यवस्था करावी. झुडूपे हटविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचनाही त्यांनी केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ज्यांचे वाहन परवाने रद्द झाले आहेत, त्यांची माहिती घेऊन समाजमाध्यमावर जाहीर करण्याची सूचनाही पोलीसप्रमुखांनी केली. जेथे ब्लॅकस्पॉट आहेत, तेथे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी करून अपघात नियंत्रणासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली.