येळ्ळूर ग्रा.पं.मधील बेकायदेशीर विकासकामांबाबत तात्काळ कारवाई करा
सदस्यांची पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी : चौकशी करण्याचे आश्वासन
बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतीमध्ये झालेल्या बेकायदेशीर विकासकामांबाबत तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी येळ्ळूर ग्राम पंचायतीचे सदस्य तसेच दलित संघटनेच्यावतीने जिल्हा पालकमंत्री, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. आपण या संदर्भात चौकशी करून अधिकाऱ्यांना सूचना करू, असे आश्वासन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले. ग्राम पंचायतीमध्ये बेकायदेशीररित्या निधीचा वापर करत विकासकामे राबविण्यात आली आहेत. याबाबत एडीजीपीनी दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याने तसेच आठवडाभरात कोणतीही कारवाई न झाल्याने लोकायुक्तांकडे तक्रार करण्यासह रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. अनुसूचित जाती आणि जमाती लोकांवर अन्याय करून ग्राम पंचायतीमार्फत 27 विकासकामांवर 40 ते 50 लाख रुपये बेकायदेशीररित्या खर्च करण्यात आल्याचे निवेदन देण्यात आले.
पीडीओ-अध्यक्षांवर कारवाईचे आदेश
एडीजीपींनी जिल्हा पंचायतीच्या सीईओंना पत्र देऊन पीडीओ तसेच अध्यक्षांवर कारवाईचे आदेश दिले होते. परंतु आजतागायत जिल्हा पंचायत प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दोषींवर तात्काळ कारवाईचा इशारा ग्रा. पं. सदस्य व दलित संघटनांकडून दिला आहे. यावेळी ग्रा. पं. उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी ग्रा. पं. अध्यक्ष व विद्यमान सदस्य सतीश पाटील, शिवाजी नंदूरकर, रमेश मेणसे, पिंटू चौगुले, मनीषा घाडी, शालन पाटील, परशराम परीट, येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष विलास घाडी, दलित संघटनेचे पदाधिकारी लक्ष्मण छत्र्याण्णवर, शशिकांत हुवाण्णवर, महेश हुवाण्णवर, मनोहर पाटील, परशराम घाडी यासह इतर सदस्य उपस्थित होते.