येळ्ळूर ग्रा. पं.मधील बेकायदेशीर कृत्यांबाबत त्वरित कारवाई करा
अॅड. सुरेंद्र उगारे यांचा पत्रकार परिषदेत इशारा
बेळगाव : येळळूर ग्राम पंचायतीमध्ये झालेल्या बेकायदेशीर कृत्यांबाबत एडीजीपींनी दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यास, तसेच आठवड्याभरात कारवाई न झाल्यास लोकायुक्तांकडे तक्रार करण्यासह जनहित याचिका दाखल केली जाईल, असा इशारा वकील व पर्यावरणवादी सुरेंद्र उगारे यांनी दिला आहे. गुरुवारी कन्नड साहित्य भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांवर झालेल्या अन्यायाबद्दल कारवाई केल्याचे सरकार खोटे बोलत आहे. येळ्ळूर ग्राम पंचायतीकडून 27 कामे करून 40 ते 50 लाख रुपये बेकायदेशीरपणे खर्च केले आहेत.
जिल्हा पंचायत आणि मंत्र्यांना कागदपत्रांसह विनंती करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. याशिवाय 19 लाख 65 हजार रुपयांची 7 कामे करण्यात आली आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख आणि नागरीक हक्क आयोगाकडे तक्रार करण्यात आली असून बेकायदेशीर कामे करण्यात आल्याचा आरोप केला आहे. एडीजीपींनी जि. पं. सीईओंना पत्र लिहून पीडीओ आणि अध्यक्ष, उपाध्यक्षांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तथापि, 3 महिन्यांपासून कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. जर सरकारचा हेतू अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याचा असेल तर सरकार कारवाई करण्याचा बनाव का करत आहे. आठवडाभरात कारवाई न झाल्यास याबाबत लोकायुक्तांकडे तक्रार करण्यासह न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी लक्ष्मण छत्रण्णवर, हणमंत बेरडे, शशिकांत हुवण्णवर, कुमार कांबळे उपस्थित होते.