For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाणीटंचाई उद्भवल्यास समन्वयाने उपाययोजना करा

06:50 AM Jul 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाणीटंचाई उद्भवल्यास समन्वयाने उपाययोजना करा
Advertisement

16 पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची सूचना : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक

Advertisement

जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आवश्यकतेनुसार राखीव निधीचा वापर करावा. सध्या पाऊस सुरू आहे, हा पाऊस असाच होत राहिला तर पाणीटंचाई कमी होणार आहे. तथापि, पाऊस आपेक्षेप्रमाणे झाला नाही तर खासगी कूपनलिका व टँकरद्वारे तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा. पावसाळ्यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करत तातडीने प्रतिसाद द्यावा, अशी सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.

त.भ.प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव : शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जारकीहोळी म्हणाले, पावसाळ्यात गळती होणाऱ्या किंवा धोकादायक शाळा इमारतींमध्ये वर्ग भरवू नयेत. तसेच जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा पुरेसा साठा ठेवण्याबरोबरच पावसामुळे मनुष्य किंवा पशुधनाची हानी झाल्यास नुकसानभरपाईचे वितरण तातडीने करावे. पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने आरोग्य विभागाने आवश्यक औषधसाठा, उपचार व्यवस्था व जनजागृती मोहीम राबवावी. याशिवाय शेतकऱ्यांना बियाणे व खतांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्याची सूचना त्यांनी कृषी विभागाला केली.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 26 टक्के कमी पाऊस झाला आहे. सध्या 7 तालुक्मयांतील 32 गावे पाणीटंचाईचा सामना करत असून 15 गावांना टँकरद्वारे तर 23 गावांना खासगी कूपनलिकांद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

महापालिका हद्दीत गरज भासल्यास 35 टँकर तैनात करण्याची तयारी करण्यात आली आहे. पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व टँकरवर जीपीएस प्रणालीद्वारे देखरेख ठेवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात 11 लाखांवर एसआयआर अर्ज वाटप केले आहेत. बीएलओंनी रविवार दि. 5 पर्यंत 100 टक्के अर्ज वाटप करावेत. जे शिक्षक बीएलओचे काम करत आहेत, त्यांना हजेरीबाबत विशेष सवलत दिली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आमदार आसिफ सेठ यांनी शहरातील पाणीपुरवठा केंद्रांवर वीजपुरवठा खंडित झाल्यास संबंधित विभागांनी तातडीने समन्वय साधावा. तसेच महापालिका आणि पाणीपुरवठा संस्थांनी नागरिकांना नियमित पाणी मिळण्यासाठी संयुक्त कृती करावी, असे सांगितले.

कृषी विभागाचे सहसंचालक एच. डी. कोळेकर म्हणाले, यंदाच्या खरीप हंगामात 7 लाख 52 हजार 312 हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी 6 लाख 1 हजार 688 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून हे उद्दिष्टाच्या 80 टक्के आहे. जिल्ह्यात बियाणे आणि खतांचा कोणताही तुटवडा नाही. सौंदत्ती, रामदुर्ग व अथणी तालुक्यात पावसाची गरज असून पावसाविना पिकांना धोका निर्माण झाला आहे. शनिवारी एकाच दिवशी बैलहोंगल, नेसरगी, हिरेबागेवाडी, मुरगोड विभागातील 45 ग्रा. पं. तील 90 गावांमध्ये पीक संरक्षण मोहीम राबविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

फलोत्पादन विभागाने उद्दिष्टाच्या 74 टक्के क्षेत्रावर लागवड पूर्ण केली असून पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. तसेच पशुसंवर्धन विभागाने 19 लाख टन चाऱ्याचा साठा उपलब्ध असून तो पुरेसा आहे. तसेच जनावरांना एचएफसह विविध लसीकरण करण्यात आल्याची माहिती दिली.

शिक्षण विभागाने धोकादायक शाळा इमारतींची पाहणी करून आवश्यक दुऊस्ती सुरू केली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 1200 वर्गखोल्या जीर्ण आहेत. अयोग्य वर्गखोल्यांतील विद्यार्थ्यांना सुरक्षित खोल्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच 1612 अतिथी शिक्षकांची नेमणूक केली असून 22 नव्या माध्यमिक शाळा मंजूर केल्याची माहिती डीडीपीआय लीलावती हिरेमठ यांनी दिली.

आरोग्य विभागाने पावसाळ्यातील संसर्गजन्य रोगांवर नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. खानापूर तालुक्मयात वाहतुकीच्या अडचणी लक्षात घेऊन 15 गावांमध्ये ऊग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्याची तयारी केली असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. ईश्वर गडाद यांनी सांगितले. यावेळी विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.