सीमाप्रश्नासंदर्भात ठोस पावले उचला
शुभम शेळके यांची तज्ञ समितीकडे मागणी : मुंबई येथे घेतली भेट
बेळगाव : सीमाभागातील मराठी माणूस मागील 70 वर्षांपासून कर्नाटक सरकार व प्रशासनाकडून होणाऱ्या भाषिक अत्याचाराचा बळी ठरला आहे. लोकशाहीमार्गाने दिलेले भाषिक हक्क डावलून येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व कार्यकर्त्यांवर विविध प्रकारे गुन्हे दाखल केले जातात. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात महाराष्ट्र गीत लावल्याचा ठपका ठेवत दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर मराठीची मागणी करणाऱ्या म. ए. समितीच्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याबाबत कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी तज्ञ समितीच्या सदस्यांकडे केली.
मुंबई येथे बुधवारी झालेल्या तज्ञ समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित राहून शुभम शेळके यांनी मराठी भाषिकांच्या व्यथा समितीसमोर मांडल्या. बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर शाईफेक करून विटंबना करण्यात आली. म्हणून बेळगावमध्ये समाजकंटकांचा निषेध करून निदर्शने केली. यासाठी शिवभक्तांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात पाठविण्यात आले. अन्यायाविरोधात आवाज उठविल्याबद्दल शुभम शेळके यांना हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली.
डिसेंबर 2022 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमाभागात शांतता नांदावी, यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक सरकारची त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याची सूचना केली होती. परंतु ती समिती अद्याप स्थापन करण्यात आलेली नाही. केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे आयुक्त बेळगावमध्ये येऊन त्यांनी अनेक सूचना केल्या होत्या. त्याकडेही कर्नाटक सरकारने दुर्लक्ष केल्याने त्या कागदावरच राहिल्या. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ठोस पावले उचलून खटला सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर आणावा, अशी मागणी युवा समिती सीमाभागाच्यावतीने करण्यात आली. यावेळी अशोक घगवे, राजू पाटील, सूरज जाधव, साईराज कुगजी, दिगंबर खांबले यांसह इतर उपस्थित होते.