For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीबीआय चौकशी आदेश परत घ्या!

07:00 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
सीबीआय चौकशी आदेश परत घ्या
Advertisement

नवी दिल्ली : दिल्लीतील गाजलेल्या मद्यधोरण घोटाळ्यातील आरोपी आणि सध्या कारागृहात असलेल्या आंध्र प्रदेशातील भारत राष्ट्रीय समिती पक्षाच्या नेत्या कविता यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारागृहात त्यांची चौकशी करण्याची अनुमती न्यायालयाने सीबीआयला दिल्याने त्यांच्या चौकशीचे आणखी एक सत्र आता सुरु होणार आहे. कारागृहात चौकशी करण्यासाठी सीबीआयला दिलेली अनुमती मागे घ्या, अशी विनंती करणारा अर्ज त्यांनी न्यायालयात शनिवारी सादर केला आहे. सीबीआयने न्यायालयाची दिशाभूल करुन असा आदेश मिळविला असल्याची शक्यता आहे. हा आदेश मिळविताना सीबीआयने सर्व नियम धाब्यावर बसविले आहेत. त्यामुळे न्यायालयाने हा आदेश मागे घ्यावा, असा युक्तीवाद कविता यांचे वकील नितेश राणा यांनी केला. न्यायालयाने सीबीआयला प्रत्युत्तर देण्याचा आदेश दिला. प्रत्युत्तरासाठी सीबीआयने कालावधी मागितल्यानंतर न्यायालयाने पुढची सुनावणी 10 एप्रिलला होईल असे स्पष्ट केले. कारागृहात कविता यांची चौकशी करण्याचा आदेश सीबीआयने शुक्रवारी मिळविला होता. विशेष सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीश कावेरी बवेजा यांनी कविता यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद पूर्ण ऐकल्यानंतच निर्णय दिला जाईल, असे त्यांनी कविता यांच्या वकीलांकडे स्पष्ट करत सुनावणी पुढे ढकलली.

Advertisement

Advertisement
Tags :

.