For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाच गॅरंटी योजनांचा सदुपयोग करून घ्या

10:54 AM Feb 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाच गॅरंटी योजनांचा सदुपयोग करून घ्या
Advertisement

गॅरंटी योजनांच्या लाभार्थी मेळाव्यात पालकमंत्र्यांचे आवाहन : गरिबांच्या कल्याणासाठी सरकारकडून दरवर्षी 60 हजार कोटी रुपये खर्च

Advertisement

बेळगाव : पाच गॅरंटी योजनांच्या माध्यमातून गरीब व मध्यमवर्गीयांचा आर्थिकस्तर सुधारण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले आहेत. गृहलक्ष्मीसह पाच योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक सुविधांचा सदुपयोग करावा, असे आवाहन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सरदार्स हायस्कूल मैदानावर गॅरंटी योजनांच्या लाभार्थ्यांच्या मेळाव्यात बोलताना पालकमंत्र्यांनी वरील आवाहन केले. अनेक अडचणी पार करत या योजनांसाठी, गरिबांच्या कल्याणासाठी सरकार दरवर्षी 60 हजार कोटी रुपये खर्च करते. भविष्यात नवीन इस्पितळे, शाळा, रस्त्यांच्या उभारणीला प्राधान्य देण्यात येणार आहे. याबरोबरच तलाव भरणी, कॅन्सर इस्पितळाची उभारणी करण्यात येणार असून लवकरच सुपरस्पेशालिटी इस्पितळ सुरू होणार आहे. गॅरंटी योजनांतून मिळणाऱ्या पैशांचा वापर आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी करावा व या योजना घरोघरी पोहोचवाव्यात, असे आवाहनही सतीश जारकीहोळी यांनी केले. जे गरीब मुलांच्या हातात ध्वज देत आहेत, त्यांची मुले परदेशात शिकतात. अशा षड्यंत्रासंबंधी नागरिकांनी जागरुकता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, गॅरंटी योजनांमुळे राज्याची आर्थिक स्थिती दिवाळखोरीत निघाली आहे, अशी टीका करणारेच आज पाच गॅरंटी योजनांचा लाभ घेत आहेत. त्यांनी यासंबंधी आत्मपरीक्षण करावे. गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कुटुंबप्रमुख महिलेला दरवर्षी 24 हजार रुपये देऊन गरिबांना मदत केली जाते. केवळ बेळगाव जिल्ह्यासाठी प्रतिमहा 212 कोटी रुपये दिले जात आहेत. ही रक्कम कमी नाही. काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर लोकांच्या समस्यांचा विचार करून त्या दूर करण्यासाठी योजना राबविण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे या योजनांचे सरदार आहेत, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमात आमदार राजू सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, राज्य सरकारचे नवी दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी, सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील, पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार व्हनकेरी, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, कन्नड व संस्कृती खात्याच्या विद्यावती बजंत्री, नगरविकास कोषचे मल्लिकार्जुन कलादगी आदींसह नगरसेवक, लोकप्रतिनिधी, अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.