विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करा
महानगरपालिका आयुक्तांची अधिकाऱ्यांना सूचना : मनपाचे उत्पन्न वाढविण्याकडे लक्ष द्या
बेळगाव : शहरामध्ये विनापरवाना अनेक व्यवसाय केले जात आहेत. त्यांच्या विरोधात मध्यंतरी कारवाई करण्यात आली होती. मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात विनापरवाना व्यवसाय सुरूच आहेत. त्यामुळे महानगरपालिकेचा कर बुडत आहे. त्याबाबत गांभीर्याने विचार करून कर कसा वाढ होईल याकडे लक्ष द्या, अशी सूचना मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. व्यवसाय परवान्यातील कर आतापर्यंत केवळ 14 टक्केच जमा झाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेला फटका बसला आहे. महानगरपालिकेचे जास्तीतजास्त उत्पन्न कसे वाढेल, याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. उत्पन्नापेक्षा महानगरपालिकेवर खर्चाचा ताण अधिक पडत आहे. याबाबत लेखा विभागाने संपूर्ण अहवाल दिला आहे. त्यासाठी आता करवाढीकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे आयुक्तांनी सांगितले.
महानगरपालिका आर्थिक अडचणीमध्ये सापडली आहे. नुकसानभरपाई देण्यासाठी महानगरपालिकेकडे रक्कम कमी पडत आहे. याबाबत नुकताच मोठा गोंधळ उडाला आहे. रस्ता रुंदीकरणाची रक्कम देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. योग्यप्रकारे नियोजन करण्यात आले नसल्यामुळे त्याचा फटका मनपाला बसत आहे. आता साऱ्यांनीच उत्पन्नाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 64 लाख रुपये आतापर्यंत व्यवसाय कर जमा झाला आहे. हा कर अत्यंत कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक जण परवाना न घेताच व्यवसाय थाटून बसले आहेत. त्यामध्ये महानगरपालिकेचे मोठे नुकसान होत आहे.
गणेशोत्सवानंतर कारवाईचा बडगा उगारणार
व्यावसायिकांना तातडीने परवाना देण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून महानगरपालिकेला अधिक उत्पन्न मिळेल. ज्यांनी परवाना घेतला नाही त्यांच्याविरोधात कारवाई करा, असे आयुक्तांनी महसूल व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. त्यामुळे आता गणेशोत्सवानंतर विनापरवाना व्यावसायिकांविरोधात कारवाईचा बडगा उगारणार आहे.