गैरसमज पसरविणाऱ्यांवर कारवाई करा
जय किसान भाजी मार्केट असोसिएशनची मागणी, साहाय्यक निबंधक विभागाला निवेदन
बेळगाव : जय किसान भाजीमार्केट असोसिएशन संदर्भात चुकीचे गैरसमज पसरविले जात आहेत. सहकारी नियमानुसार असोसिएशनचा कारभार पारदर्शकपणे सुरू असून गैरसमज पसरविणाऱ्यांवर कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी जय किसान भाजीमार्केट असोसिएशनने केली आहे. याबाबतचे निवेदन सहकार संघ साहाय्यक निबंधक बेळगाव उपविभाग कार्यालयातील रविंद्र पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. जय किसान भाजीमार्केट असोसिएशन मागील 30 ते 40 वर्षांपासून कार्यरत आहे. दर पाच वर्षांनी बिनविरोध निवडणूक करून संघटनेचे कार्य पारदर्शकपणे सुरू आहे. शिवाय मागीलवर्षी झालेल्या सभेत कामकाजाबाबतची माहिती देण्यात आली आहे.
मात्र काही लोकांनी भाजीमार्केटबाबत चुकीचे गैरसमज पसरून भ्रम निर्माण केला आहे. संघटना कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता व्यावसायिक सदस्यांच्या हितासाठी काम करीत आहेत. शिवाय न्यायालयातील प्रकरणे संपल्यानंतर निवडणूकही पारदर्शक पद्धतीने घेतली जाणार आहे. मात्र विनाकारण काही लोक असोसिएशनबाबत समाजात गैरसमज आणि चुकीची माहिती पसरवत आहेत. अशांवर कारवाई करून असोसिएशनला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी उपाध्यक्ष मोहन मन्नोळकर, संचालक सुनील भोसले, उमेश पाटील, विश्वनाथ पाटील, काका हावळ, राजू पाटील, सुर्यकांत भावी, तम्माण्णा हुदलीमठ, शिवाजी मंडोळकर, एम. एल. खांडेकर, उमर बडिगेर, विनायक तुक्कर यासह व्यापारी सदस्य उपस्थित होते.