येळ्ळूर ग्रा.पं.गैरकारभारातील दोषींवर कारवाई करा
पत्रकार परिषदेत ग्राम पंचायत सदस्यांची मागणी
बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात 29 विकासकामे राबविण्याच्या नावाखाली निधी लाटण्याचा प्रकार सुरू आहे. खोटी कागदपत्रे तयार करून हा बेकायदेशीर प्रकार सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष व विद्यमान सदस्य सतीश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. येळ्ळूर ग्राम पंचायतमध्ये 2018-19 या आर्थिक वर्षात चौदाव्या वित्त आयोग योजनेंतर्गत विकासकामे राबविण्यात आली आहेत, असे भासवून निधी उकळण्याचा प्रकार सुरू झाला आहे. या विकासकामांसाठी 54 लाखांची बिले तयार करण्यात आली आहेत.
याबाबत पंचायत राज खाते आणि कर्नाटक लोकायुक्तांकडे तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये ग्राम पंचायत अध्यक्षा, पीडीओ, तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी आणि इतर साहाय्यक अभियंत्यांचाही सहभाग आहे. याबाबत जिल्हा पंचायतीकडे तक्रार देऊन सदर गैरव्यवहार त्यांच्या निदर्शनास आणून देऊन तो थांबवावा, अशी मागणी करण्यात आली होती. या बेकायदेशीर प्रकरणातील सदस्यांचे सदस्यत्व रद्द करावे आणि संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. यावेळी ग्रा. पं. उपाध्यक्ष प्रमोद पाटील, रमेश मेणसे, परशराम परीट, शिवाजी नांदूरकर, जोतिबा चौगुले, लक्ष्मण छत्रन्नवर, मनीषा घाडी, सोनाली यळ्ळूरकर, शालन पाटील यासह अॅड. सुरेंद्र उगारे आदी उपस्थित होते.