For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेती रस्ते बंद करणाऱ्यांवर कारवाई करा

10:20 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेती रस्ते बंद करणाऱ्यांवर कारवाई करा
Advertisement

शेतकरी सुधारणा युवक मंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : शहराजवळ असणाऱ्या शेतजमिनीमध्ये प्लॉट निर्माण करून जमिनी विकल्या जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांसाठी परंपरागत ठेवण्यात आलेले रस्ते व पायवाटा बंद केल्या जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी ये-जा करणे अडचणीचे ठरत आहे. येळ्ळूर रोड येथील गाडेमार्ग परिसरातील शेतकऱ्यांना अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या व्यवसायावर गंडांतर आले आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रक्रियेवर रोख लावावी, अशी मागणी शेतकरी सुधारणा युवक मंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. महसूल निरीक्षक एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. येळ्ळूर रोड गाडेमार्ग येथील शेतकऱ्यांना शेतीमध्ये ये-जा करण्यासाठी परंपरागत रस्ते ठेवण्यात आले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या भागामध्ये जमिनींची विक्री करून त्या ठिकाणी इमारती बांधल्या जात आहेत.

त्यामुळे शेतीला असणारे रस्ते बंद होत आहेत. संबंधित नागरिकांना अनेकवेळा शेतकऱ्यांकडून सूचना करूनही शेतीला उपयोगी ठरणारे रस्ते बंद केले जात आहेत. याचा परिणाम शेतीव्यवसायावर होत आहे. भविष्यात असे प्रकार वाढत गेल्यास शेतकऱ्यांना शेतीला ये-जा करणे कठीण होईल व पिके घेणे अशक्य ठरणार आहे. यासाठी अशा गैरप्रकारांवर आळा घालावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. एका आर्थिक संस्थेकडून या भागात बेकायदेशीरपणे प्लॉट निर्माण करून जमिनीची विक्री चालविली आहे. त्यामुळे शेतीला ये-जा करण्यासाठी असणारा मार्ग बंद झाला आहे. असे गैरप्रकार ताबडतोब थांबविण्यात यावेत. शेतकऱ्यांना सोयीचे होईल, याप्रकारे जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा. बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी शेती सुधारणा युवक मंडळाने केली. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.