For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्लास्टिक राष्ट्रध्वजांच्या वापरावर कारवाई करा; ‘राष्ट्रध्वज संरक्षण कृती समिती’ स्थापन करण्याची मागणी

प्लास्टिक राष्ट्रध्वजांच्या वापरावर कारवाई करा  ‘राष्ट्रध्वज संरक्षण कृती समिती’ स्थापन करण्याची मागणी
Advertisement

मालवण : राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी आवश्यक कायदेशीर कारवाई करून जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मालवण तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Advertisement

१५ ऑगस्ट व २६ जानेवारीनंतर रस्त्यांवर, कचरापेट्यांमध्ये तसेच विविध ठिकाणी प्लास्टिकचे राष्ट्रध्वज पडलेल्या अवस्थेत आढळतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होण्याची शक्यता असून, याबाबत प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी हिंदू जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी राज्य शासनाने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांनीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचा वापर टाळण्याबाबत सूचना केल्या आहेत.

Advertisement

देशात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी असताना प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचे उत्पादन व विक्री होत असल्यास संबंधितांवर कायद्यानुसार तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच ‘भारतीय ध्वजसंहिता’ आणि राष्ट्रध्वजाच्या सन्मानासंदर्भातील कायदेशीर तरतुदींचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हिंदू जनजागृती समितीने प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहे. यात जिल्हास्तरावर ‘राष्ट्रध्वज संरक्षण कृती समिती’ स्थापन करून स्वयंसेवी संस्थांचा त्यात समावेश करावा. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांच्या उत्पादन, साठवणूक, वितरण किंवा विक्रीप्रकरणी संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजकांमार्फत ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ ही जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवावी. स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनानंतर सार्वजनिक ठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज तातडीने संकलित करून भारतीय ध्वजसंहितेनुसार सन्मानपूर्वक विल्हेवाट लावण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश द्यावेत.
हिंदू जनजागृती समितीने या मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. निवेदनाची प्रत मालवण तहसील कार्यालयात ११ ऑगस्ट २०२६ रोजी सादर करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.