अवैधरित्या मालवाहतूक करणाऱ्या खासगी बसेसवर कारवाई करा
मनसेची आरटीओकडे मागणी ; अन्यथा बसेस रोखण्याचा दिला इशारा
कुडाळ.
मुंबई गोवा महामार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या खासगी प्रवासी बसमधून मोठ्या प्रमाणात अवैध रित्या मालवाहतूक केली जात आहे. सदर बसमालक हे प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना मोठ्या प्रमाणात मालवाहतूक करतात.मालवाहतूक करणाऱ्या बसेस वर कडक कारवाई करावी. अन्यथा रस्त्यावर उतरून मालवाहतूक करणाऱ्या या बसेस रोखण्याचा इशारा सिंधुदुर्ग मनसेच्यावतीने प्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी याना निवेदनाद्वारे दिला आहे. खासगी बसेस मधून विनापरवाना व अवैधरित्या मालवाहतूक सुरू आहे त्यावर कारवाई व्हावी यासाठी मनसेच्या मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपप्रादेशिक अधिकारी श्री काळे यांची भेट याबाबत त्यांना निवेदन दिले.उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, उपतालुकाध्यक्ष गजानन राऊळ, वाहतूकसेना मनसे विजय जांभळे, माजी उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष कुडाळ यतीन माजगावकर उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, खासगी बसेस मधून मोठ्या प्रमाणात आंबा पेटी वाहतूक, हार्डवेअर चे सामान, जनावरांचे मास, औद्योगिक कंपन्याचा कच्चा माल , तयार झालेला माल इत्यादींची वाहतूक केली जात आहे. याचा फटका सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील गुड्स परमिट असलेल्या स्थानिक टेम्पो, ट्रक, व्यवसायिकाना बसतो. स्लिपर कोच, प्रवाशी आसन, कॅरिअर (टप) आणि डीकीमधुन अशी माल वाहतूक होते. प्रवासी भाड्या पेक्षा अशा प्रकारचा विना बिलाचा आणि जीएसटी चुकविलेला माल याचे जास्त भाडे खासगी बस मालकाना मिळते. त्यामुळे अवाजवी प्रवाशी भाडे वाढ, प्रवाशांशी अरेरावी हे प्रकार होतात .यालाच आळा बसविण्यासाठी यापूर्वी देखील मनसेचे वाहतूक सेना पदाधिकारी विजय जांभळे यांनी अनेक आंदोलने केली होती. परंतु किरकोळ कारवाई वगळता आरटीओ मार्फत ठोस अशी कोणतीच कारवाई अद्याप करण्यात आली नाही. सदर अतिरिक्त भाडे वाढ व विना परवाना मालवाहतूक यावर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून खासगी बसेस मधून होणारी मालवाहतूक रोखण्याचा इशारा दिला आहे.